
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ झाल्यानंतर राजकारण पेटलं आहे. लातूरमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कोकोटेंच्या राजीनाम्याबाबत निवेदन दिले होते. मात्र यानंतर राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला होता. यावेळी राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण यांनी विजय घाडगे यांनी मारहाण केली होती. त्यानंतर आता सूरज चव्हाणांना याचा मोठा फटका बसला आहे.
लातूरमधील राड्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यावर पक्षाने कारवाई केली होती, त्यांना पदाचा राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आले होते. ‘लातूरमध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर, मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केले जाणारे वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारले जाणार नाही, यासाठी हा कठोर निर्णय घेतला आहे’ असं अजित पवार यांनी ट्वीट करत म्हटलं होतं.
सूरज चव्हाण यांच्यासाठी राष्ट्रवादीचे दरवाजे बंद
अजित पवार यांनी आज छावा संघटनेचे कार्यकर्ते विजय घाडगे यांची भेट घेतली. यावेळी अजित पवारांनी काय म्हटलं याची माहिती घाडगे यांनी दिली आहे. सूरज चव्हाण यांना आता पुन्हा पक्षात घेतलं जाणार नाही असं अजित पवारांनी म्हटलं असल्याचे घाडगे यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता या मारहाणीच्या प्रकरणामुळे सूरज चव्हाण यांची राजकीय कारकीर्द धोक्यात आली आहे.
सुनील तटकरेंकडून जाहीर नाराजी
सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात निवेदन द्यायला आलेल्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकले होते. यानंतर राडा झाला होता. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही सूरज चव्हाण यांच्या कृत्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली होती.
सूरज चव्हाण कोण आहेत?
सूरज चव्हाण हे अजित पवार यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात होते. अजित पवारांनी शरद पवारांपासून वेगळा होण्याचा निर्णय घेतला तेव्हा सुरुवातीपासून चव्हाण अजित पवारांसोबत होते. मात्र आता त्यांच्यावर ही कारवाई झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.