Maharashtra DCM : उद्याच नव्या उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार? मुंबईत घडामोडींना वेग
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर नवा उपमुख्यमंत्री कोण असणार? याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचाली सुरू झाल्या असून, उद्या मुंबईमध्ये आमदारांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर नवा उपमुख्यमंत्री कोण असणार? याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचाली सुरू झाल्या असून, उद्या मुंबईमध्ये आमदारांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे, याच बैठकीमध्ये उपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. समोर आलेल्या माहितीनुसार उद्या राष्ट्रवादीने पक्षाच्या सर्व आमदारांची मुंबईमध्ये बैठक बोलावली आहे, या बैठकीमध्ये एकमुखानं नव्या उपमुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे, सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा सुरू असून, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुनेत्रा पवार यांच्याच नावावर उपमुख्यमंत्रिपदासाठी शिक्कामोर्तब होण्याची शक्यात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया समोर आली असून, त्यांनी मोठं विधान केलं आहे. जर उद्या उपमुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय झाला तर उद्याच नव्या उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो असं त्यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हटले भुजबळ?
‘अजितदादा गेले आणि ज्या पद्धतीने ते गेले ते पाहून झोप उडाली. शेवटी शो मस्ट गो ऑन. कुणाकडे तरी जबाबदारी देऊन पक्ष चालवला पाहिजे. उद्या विधान मंडळाचे सदस्य आहेत. त्यांची बैठक बोलावली आहे. त्यात विधान मंडळ प्रमुखपद अजितदादांकडे होतं, ते पद कोणाकडे द्यायचं? याबाबत निर्णय होईल. सुनेत्रा ताईंकडे पद देण्याची मागणी आहे. ते रास्त आहे. टीव्हीलाही मी ऐकत आहे. ते काही चूक आहे असं वाटत नाही. त्याबाबत निर्णय घेतला पाहिजे. बैठकीत तो निर्णय होईल.
उपमुख्यमंत्रिपदाची जागा रिक्त आहे. उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतं. बाकी नंतर बघू, उद्याची मिटिंग सीएलपीची आहे. सीएलपीचा नेता म्हणजे विधीमंडळ पक्षप्रमुख ठरवण्याची मिटिंग आहे. तेवढी मिटिंग आहे. कदाचित एकमत झालं तर उद्याच्या उद्याच नव्या उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधीही होऊ शकतो, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे. दरम्यान उद्या राष्ट्रवादीने आमदारांची बैठक बोलावली आहे, त्यामुळे आता या बैठकीत नव्या उपमुख्यमंत्र्यांचा निर्णय होणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
