जे कार्यालयात भेटत नव्हते ते आज गल्ली-बोळात फिरु लागलेत, केसरकरांच्या निशाण्यावर नेमके कोण?

| Updated on: Sep 18, 2022 | 6:26 PM

ठाकरे कुटुंबियांबद्दल बोलायचे नाही असे ठरवले होते, पण आता खालच्या पातळीवरची टीका होत आहे. त्यामुळे कोणतेही आरोप पुढील काळात खपवून घेतले जाणार नाहीत.

जे कार्यालयात भेटत नव्हते ते आज गल्ली-बोळात फिरु लागलेत, केसरकरांच्या निशाण्यावर नेमके कोण?
दीपक केसरकर
Image Credit source: tv9
Follow us on

सिंधुदुर्ग : शिवसेनेतून बंड केले तरी (Thackeray Family) ठाकरे कुटुंबियांबद्दल विरोधात बोलायचे नाही, अशी भूमिका आमदारांनी घेतली होती. सुरवातीला ठाकरे कुटुंबिय आणि (Uddhav Thackeray) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणे टाळले गेले. पण जे शांत राहण्याचे आवाहन करीत होते तेच (Deepak Kesarkar) केसरकर आता ठाकरेंवर जहरी टीका करीत आहेत. आतापर्यंत मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरील कार्यालयात भेटत नव्हते ते आता गल्ली-बोळात फिरु लागले असल्याचे केसरकर म्हणाले आहेत. राज्यात येणाऱ्या उद्योगांना यांच्याकडूनच विरोध होत असल्याचे सांगताना केसरकर यांनी ही टोकाची टीका केली आहे. उद्योगधंद्यामध्ये असेच राजकारण येत राहिले तर महाराष्ट्रात प्रकल्प घेऊन येताना संबंधित कंपनी 10 वेळेस विचार करेल असेही केसरकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे विकास कामामध्ये राजकारण नको अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

राज्याच्या विकासात उद्योग-व्यवसायांची मोठी भूमिका राहिलेली आहे. याच उद्योगातून बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार आहे. पण केवळ राजकीय स्वार्थ साधण्यासाठी अशा प्रकल्पांना विरोध करु नये असे आवाहन केसरकरांनी केले आहे. लोकांना भडकावून आपण सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करायचे हे कुठेतरी थांबले पाहिजे असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

राज्यातील तरुण आता जागरुक झाला आहे. त्यांची माथी भडकावून आता काय साध्य होणार नाही. त्यांना बरोबर घेऊनच राज्य विकासाच्या वाटेवर घेऊन जायचे आहे. त्यामुळे विरोधकांनी कोणतिही खेळी केली तरी ती साध्य होणार नसल्याचे केसरकर म्हणाले आहेत.

अडीच वर्ष सत्ता असताना हे काही काम करु शकलेले नाहीत. आता केंद्रात आणि राज्यात एकच सरकार असल्याने विकास कामे खेचून आणत येतात. तर यालाही विरोध दर्शवायचा, हे आता जनता खपवून घेणार नाही. त्यामुळे विकास कामात राजकारण आणू नये असा सल्ला केसरकरांनी विरोधकांना दिला आहे.

ठाकरे कुटुंबियांबद्दल बोलायचे नाही असे ठरवले होते, पण आता खालच्या पातळीवरची टीका होत आहे. त्यामुळे कोणतेही आरोप पुढील काळात खपवून घेतले जाणार नाहीत. जशाच तसे उत्तर दिले जाणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले आहे.

आता राजकारण सोडून राज्याच्या हितासाठी उद्योग-व्यवसायाच्या वेळी एकत्र येणे गरजेचे आहे. अन्यथा येथील राजकीय परस्थिती पाहून संबंधित कंपन्या ह्या 10 वेळेस विचार करुन परत जातील. त्यामुळे विकासकामात राजकारण करु नका अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.