मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीतील टॉप-5 लढती

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीतील टॉप-5 लढती

भोपाल : मध्य प्रदेशात गेल्या 15 वर्षांपासून शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्त्वात भाजपची सत्ता आहे. मात्र, यावेळी सर्वेक्षणं पाहता, मध्य प्रदेशात भाजप पुन्हा सत्तेत येण्यावर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये काहीसं आनंदाचं वातावरण आहे. जनतेची मतं सध्या मतपेटीत बंद असून, उद्या म्हणजे 11 डिसेंबर रोजी निकाल स्पष्ट होणार आहे. मध्य प्रदेशची सत्ता कुणाकडे असेल, हे उद्या कळेल. तत्पूर्वी मध्य प्रदेशमध्ये सर्वात महत्त्वाच्या पाच जागा कोणत्या असतील, ज्यांच्याकडे अवघ्या देशाचं लक्ष असेल, त्या पाहूया :

  1. बुधनी मतदारसंघ – मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान

गेल्या तीनवेळा शिवराज सिंह चौहान बुधनी मतदारसंघातून भाजपचे विजयी उमेदवार आहेत. तीनवेळा ते मुख्यमंत्री राहिले आहेत. 2013 साली तर चौहान यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला तब्बल 84,805मतांच्या फरकाने पराभूत केलं होतं.

आता अरुण यादव हे काँग्रेस उमेदवार शिवराज सिंह चौहान यांना टक्कर देत आहेत. मात्र, अरुण यादव हे मतदारसंघाच्या बाहेरचे आहेत. त्यामुळे चौहान यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

  1. शिवपुरी मतदारसंघ – क्रीडा मंत्री यशोधरा राजे शिंदे

ज्योतिरादित्य शिंदे यांची आत्या असलेल्या यशोधरा राजे शिंदे या शिवपुरीतून भाजपच्या तिकिटावर उभ्या आहेत. राजस्थानच्या मुख्यंमंत्री वसुंधरा राजेंच्या त्या सख्ख्या बहीण आहेत. काँग्रेसकडून सिद्धार्थ लाडा उभे आहेत. सिद्धार्थ यांची ताकद फारच कमी आहे.

  1. गोविंदपुरा मतदारसंघ – कृष्णा गौर

भाजपचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल गौर हे या जागेवरुन विजयी होत असत. मात्र, आता भाजपकडून त्यांच्या मुलीला म्हणजेच कृष्णा गौर हिला उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेस, बसपा यांचे उमेदवार विरोधात उभे आहेत. मात्र, बाबूलाल गौर यांचं वजन पाहता, या जागेवर विरोधक काही करु शकतील, ही शक्यता कमी दिसतेय. मात्र, या एकंदरीत भाजपविरोधी वातावरण पाहता, या जागेबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.

  1. चुरहट मतदारसंघ – विरोधी पक्षनेते अजय सिंह

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते अजय सिंह हे चुरहटमधून लढत आहेत. 1993 ची निवडणूक वगळता 1977 पासून सलग हा मतदारसंघा अजय सिंह यांच्या कुटुंबीयांकडे राहिला आहे. याआधी अजय सिंह यांचे वडील आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अर्जुन सिंह हे या जागेवरुन आमदार होत असत. भाजपकडून शार्देंदू तिवारी उभे आहेत.2013 साली अजय सिंह यांनी तिवारी यांना पराभूत केले होते.

  1. चचौरा मतदारसंघ – लक्ष्मण सिंह

मध्य प्रदेशातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचे बंधू लक्ष्मण सिंह हे चचौरामधून काँग्रेसच्या तिकिटावर उभे आहेत. भाजपच्या ममता मीना यांच्याविरोधात ते रणांगणात आहेत. दिग्विजय सिंह यांची प्रतिष्ठा इथे पणाला लागली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI