गृहमंत्र्यांचं टार्गेट गृहमंत्री, अनिल देशमुखांचा थेट न्यायमूर्ती लोया प्रकरणाला हात?

राज्याचे नवे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी न्यायमूर्ती लोया (Maharashtra govt on Justice Loya case ) प्रकरणात हात घालत, थेट केंद्रीय गृहमंत्र्यांना टार्गेट करण्याचे संकेत दिले आहेत.

गृहमंत्र्यांचं टार्गेट गृहमंत्री, अनिल देशमुखांचा थेट न्यायमूर्ती लोया प्रकरणाला हात?

मुंबई : राज्याचे नवे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी न्यायमूर्ती लोया (Maharashtra govt on Justice Loya case ) प्रकरणात हात घालत, थेट केंद्रीय गृहमंत्र्यांना टार्गेट करण्याचे संकेत दिले आहेत. न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूप्रकरणात अमित शाहांवर आरोप आहेत. त्यामुळे याप्रकरणात हात घालून, राष्ट्रवादीचे नेते असलेले अनिल देशमुख थेट अमित शाहांना आव्हान देत आहेत का असा प्रश्न आहे. (Maharashtra govt on Justice Loya case )

 गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. कुख्यात गँगस्टर एजाज लकडावालाला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्याने, या कारवाईची माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत गृहमंत्री अनिल देशमुख यांना राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्न विचारण्यात आले. त्याचवेळी त्यांना न्यायमूर्ती लोया प्रकरणाबाबतही प्रश्न विचारण्यात आले.

त्यावर “काही जणांनी मला जस्टीस लोया प्रकरणात भेटण्याची विनंती केली होती. त्यावर मी त्यांना येऊन भेटा त्यानंतर मी चौकशी करतो असं त्यांना म्हटलं आहे”, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं. महत्त्वाचं म्हणजे जस्टीस लोया प्रकरणातील संबंधित लोक आजच मला भेटणार आहेत, असंही गृहमंत्री देशमुख म्हणाले.

गृहमंत्री अनिल देशमुख यांचं हे विधान म्हणजे न्यायमूर्ती लोया प्रकरणाची फाईल पुन्हा उघडण्याचे संकेत आहेत. जर ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला तर गृहमंत्री अमित शाह यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

न्यायामूर्ती लोया मृत्यू प्रकरण

जस्टिस ब्रिजगोपाल लोया हे गुजरातमधल्या सोहराबुद्दीन बनावट एन्काऊन्टर प्रकरणात CBI कोर्टाचे न्यायाधीश होते. याच खटल्यात भाजप अध्यक्ष आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही आरोप असल्याने हा खटला राजकीयदृष्ट्याही संवेदनशील झाला होता. नागपूरमध्ये एका लग्नसोहळ्याला गेलेले असताना लोया यांचा 1 डिसेंबर 2014 रोजी संशयास्पद मृत्यू झाला. जस्टिस लोया यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असे सांगण्यात येत आहे. मात्र लोया यांच्या मृत्यूनंतर सोहराबुद्दीन एन्काऊन्टर खटल्यातून अमित शाह यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

 सुप्रीम कोर्टाचा चौकशीला नकार

विरोधकांचा आरोप आहे की, न्यायाधीश लोया यांचा मृत्यू नैसर्गिक नसून या मागे काही घातपात असल्याची शक्यता आहे. मात्र  सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार लोया यांचा मृत्यू हा नैसर्गिक होता. या प्रकरणाची चौकशी करण्यास सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच नकार दिला आहे.

Published On - 4:01 pm, Thu, 9 January 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI