बंद दाराआड आणि कानात काय बोललो, ते सांगत नाहीत, मुख्यमंत्र्यांची फडणवीसांवर फटकेबाजी

युतीमध्ये असलेल्या शिवसेना-भाजपमध्ये अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदावरुन बिनसल्यानंतर 'बंद दाराआड चर्चेचा' मुद्दा उभय पक्षांमध्ये चांगलाच गाजला होता.

बंद दाराआड आणि कानात काय बोललो, ते सांगत नाहीत, मुख्यमंत्र्यांची फडणवीसांवर फटकेबाजी

मुंबई : बंद दाराआड आणि कानात एकमेकांशी काय बोललो, हे सांगण्याची आपली संस्कृती नाही, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना कानपिचक्या लगावल्या. देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेच्या विरोधीपक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अभिनंदनपर भाषण करताना फडणवीसांना टोले (Uddhav Thackeray taunts Devendra Fadnavis) लगावले.

काल मी आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं. तेव्हा काही जणांनी मला विचारलं, की तुम्ही फडणवीसांच्या कानात काय सांगितलंत? मात्र मी ते सांगणार नाही. कारण बंद दाराआड आणि कानात काय सांगितलं, हे सांगायची आपली संस्कृती नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. युतीमध्ये असलेल्या शिवसेना-भाजपमध्ये अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदावरुन बिनसल्यानंतर ‘बंद दाराआड चर्चेचा’ मुद्दा उभय पक्षांमध्ये चांगलाच गाजला होता.

’25-30 वर्ष जे माझे मित्र होते, ते आता विरोधक झाले आहेत, आणि विरोधक होते, ते आता मित्र झाले आहेत. सर्वांनी निवडणुका एकाच कारणासाठी लढल्या आहेत, मग आता विरोध कसला करायचा? विरोधी हा शब्द बाजूला काढुया आणि ज्यांनी आपल्याला इथे बसवलं त्यांच्या भल्यासाठी एकत्र येऊया’ असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी (Uddhav Thackeray taunts Devendra Fadnavis) केलं.

‘या दिवसाची या नात्याची मला अपेक्षा नव्हती. विरोधी पक्ष अस्तित्त्वात राहणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. ते खरं आहे, कारण विरोधी पक्ष हे माझे मित्र आहेत.’ असंही मुख्यमंत्री म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेच्या विरोधीपक्षनेतेपदी निवड

‘1995 साली सत्ता आली, तेव्हा शरद पवार म्हणाले होते, हे सरकार नवीन आहे, यांना सहा महिने मी काहीही विचारणार नाही’ अशी आठवण उद्धव ठाकरेंनी करुन दिली.

‘मी नशिबाने आलो आहे, भाग्याने आलो आहे. मी इथे येईन, असं कधीही बोललो नव्हतो. तरीही मला इथे यावं लागलं.’ असं उद्धव ठाकरे म्हणाले, ते ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ या देवेंद्र फडणवीसांच्या वाक्याचा समाचार घेण्यासाठीच.

‘देवेंद्रजी तुमची माझी मैत्री आहे. मी ती कधीही लपवलेली नाही, आणि लपवणारही नाही. त्यात कधीही अंतर पडणार नाही. पृथ्वीराज चव्हाणांसोबत आमचे वाद होते, छगन भुजबळांसोबतचं नातं तर जगजाहीर आहे’ असे दाखले मुख्यमंत्र्यांनी दिले.

आमचं हिंदुत्व कालही होतं, आजही आहे आणि उद्याही राहील. हिंदुत्वामध्ये दिलेले शब्द पाळणे हेही माझं हिंदुत्व आहे. मी सहकाऱ्यांना सक्त ताकीद दिली होती, की जे काही बोलायचे ते स्पष्ट बोलायचे, कपट कारस्थान आणि काळोखात काही करायचे नाही’ असंही पुढे उद्धव ठाकरे म्हणाले.

‘अभिनंदन तर आहेच. माझा मित्र तिथे बसला आहे. पण आज जर तुम्ही माझ्यासोबत असता ना, तर हा सर्व कारभार मी टीव्हीवर बसून पाहिला असता’ असा टोलाही उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray taunts Devendra Fadnavis) लगावला.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI