मी पक्षाचा झेंडा बदलला नाही, उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

| Updated on: Feb 09, 2020 | 4:16 PM

काही जण म्हणत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत गेल्याने शिवसेनेने हिंदुत्व सोडलं. पण हिंदुत्व आणि भगवा मरेपर्यंत सोडणार नाही' अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली

मी पक्षाचा झेंडा बदलला नाही, उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
Follow us on

मुंबई : मी माझ्या पक्षाचा झेंडा बदलला नाही, एक माणूस एक झेंडा. जगाला ठाऊक आहे आपलं हिंदुत्व काय आहे, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे टोला (Uddhav Thackeray taunts Raj Thackeray) लगावला. सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांनी शिवसेना आमदारांसोबत बैठक घेतली.

‘मला माझं हिंदुत्व सिद्ध करण्याची गरज नाही. कारण ते बाळासाहेबांचे हिंदुत्व आहे. ते शुद्ध आहे. मी माझ्या पक्षाचा झेंडा बदलला नाही, एक माणूस एक झेंडा. जगाला ठाऊक आहे आपलं हिंदुत्व काय आहे.’ असंही उद्धव ठाकरेंनी सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

जानेवारी महिन्यात झालेल्या मनसेच्या महाअधिवेशनात राज ठाकरे यांनी पक्षाचा नवा झेंडा लाँच केला. भगव्या रंगाच्या झेंड्यावर राजमुद्रा पाहायला मिळत आहे. मनसेने आज बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात मोर्चा काढला.

‘काही जण म्हणत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत गेल्याने शिवसेनेने हिंदुत्व सोडलं. पण हिंदुत्व आणि भगवा मरेपर्यंत सोडणार नाही’ अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांनी शिवसेना आमदारांची बैठक घेतली. बैठकीत नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीबाबत सर्व आमदारांना मार्गदर्शन करण्यात आलं. सीएए आणि एनआरसी म्हणजे नेमकं काय आहे? हे मुख्यमंत्र्यांनी समजावून सांगितलं.

दरम्यान, प्रत्येक जिल्ह्यात नियोजन केंद्र उभारणार आणि जिल्ह्यातील आमदारांसोबत नियोजन करणार, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याची माहिती आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांशी संवाद साधला.

Uddhav Thackeray taunts Raj Thackeray