उल्हासनगर महापौरपद : भाजपचा शिवसेनेला शह, ‘किंगमेकर’ पक्ष विलीन

भाजपने 'साई' पक्षालाच आपल्यात विलीन करुन घेतलं. विशेष म्हणजे महापौरपदही 'साई' पक्षालाच देऊ केलं आहे.

उल्हासनगर महापौरपद : भाजपचा शिवसेनेला शह, 'किंगमेकर' पक्ष विलीन

अंबरनाथ : उल्हासनगर महापालिकेच्या महापौरपदासाठी आज (शुक्रवार) निवडणूक होत आहे. कोणत्याही पक्षाकडे बहुमत नसल्यामुळे ‘साई’ पक्ष महापौरपदाच्या स्पर्धेत किंगमेकर ठरणार होता. त्यामुळे भाजपने ‘साई’ पक्षालाच आपल्यात विलीन करुन घेतलं. विशेष म्हणजे महापौरपदही ‘साई’ पक्षालाच देऊ केलं (Ulhasnagar Mayor Election) आहे.

महापौरपदासाठी भाजपतर्फे जमनू पुरस्वानी, साई पक्षातर्फे जीवन ईदनानी आणि शिवसेनेतर्फे लीलाबाई आशान यांनी अर्ज दाखल केले आहेत. महापालिकेत एकूण 78 नगरसेवक असून 40 ही मॅजिक फिगर आहे. त्यात भाजपचे सर्वाधिक 32, तर शिवसेनेचे 25 नगरसेवक आहेत.

सध्याची राजकीय पार्श्वभूमी पाहता शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतरांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. हे गृहित धरुन शिवसेनेची संख्या भाजपइतकीच म्हणजे 32 वर जाते. त्यानंतरही कुणाकडे बहुमताचा आकडा येत नसल्यामुळे 12 नगरसेवक असलेला ‘साई’ पक्ष किंगमेकरच्या भूमिकेत होता.

उल्हासनगर महापौरपदासाठी शिवसेना vs भाजप, दुसऱ्या मित्रपक्षाकडूनही भाजपला डोकेदुखी

‘साई’ पक्षाने महापौरपदासाठी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपने त्यांच्यावर दबाव टाकत अर्ज मागे घेण्याचा प्रयत्न केला, मात्र पक्षाचे उमेदवार जीवन ईदनानी महापौरपदाच्या मागणीवर कायम राहिल्याने अखेर त्यांना भाजपमध्ये पक्ष विलीन करण्याचा प्रस्ताव देण्यात आला. त्याला साई पक्षाने सहमती दर्शवल्याने भाजपमध्ये साई पक्षाचं विलीनीकरण झालं.

विलीनीकरणानंतर भाजपचं संख्याबळ 44 वर गेलं आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार जमनू पुरस्वानी माघार घेणार असून जीवन ईदनानी यांची महापौरपदी, तर भाजपच्या विजय पाटील यांची उपमहापौरपदी निवड निश्चित मानली जाते.

उपमहापौरपदासाठी भाजपचे विजय पाटील, साई पक्षाचे दीपक शेरवानी, रिपाइं आठवले गटाचे भगवान भालेराव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे भरत गंगोत्री यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

गेल्या अडीच वर्षांपासून उल्हासनगर महापालिकेत भाजप आणि साई पक्षाची सत्ता आहे. मात्र तरीही साई पक्षाने स्वतंत्रपणे महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. भाजपच्या तिकीटावर लढलेल्या पप्पू आणि ज्योती कलानी यांच्या स्नुषा, ओम कलानी यांच्या पत्नी पंचम कलानी उल्हासनगरच्या महापौर आहेत. तर साई पक्षाच्या जीवन इदनानी यांच्याकडे उपमहापौरपदाचा कार्यभार आहे.

भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करताना मित्रपक्ष असलेल्या ओमी कलानी गटाचे नगरसेवक मात्र सोबत नव्हते. त्यामुळे निवडणुकीत टीम ओमी कलानीच्या भूमिकेकडे लक्ष असणार आहे.

राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक उमेदवारी अर्ज भरताना शिवसेनेसोबत पाहायला मिळाले. त्यामुळे महापौरपदासाठी शिवसेना आणि उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादी अशी आघाडी झाल्याची चर्चा आहे.

एकीकडे राज्यात शिवसेनेकडून भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं जात असताना उल्हासनगरमध्ये भाजपने त्याचा बदला घेतल्याचं पाहायला मिळत (Ulhasnagar Mayor Election) आहे.

Published On - 8:05 am, Fri, 22 November 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI