उल्हासनगरमध्ये भाजपची खेळी अयशस्वी, महापौरपदी शिवसेनेच्या लीलाबाई आशन

टीम ओमी कलानीच्या पाठिंब्यावर महासेनाआघाडीला बहुमत गाठण्यात यश आलं. कोल्हापूरपाठोपाठ उल्हासनगरमध्येही महासेनाआघाडीचा विजय झाला.

उल्हासनगरमध्ये भाजपची खेळी अयशस्वी, महापौरपदी शिवसेनेच्या लीलाबाई आशन

उल्हासनगर : उल्हासनगर महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला. कारण महासेनाआघाडीच्या बळावर शिवसेनेच्या उमेदवार लीलाबाई आशन महापौरपदी विराजमान झाल्या आहेत. संख्याबळ वाढवण्यासाठी ‘साई’ पक्षाला विलीन करण्याची भाजपची खेळी अयशस्वी ठरले. शिवसेनेच्या उमेदवार लीलाबाई आशन यांना टीम ओमी कलानी आणि राष्ट्रवादीने पाठिंबा (Ulhasnagar Shivsena Mayor) दिला.

कोणत्याही पक्षाकडे बहुमत नसल्यामुळे ‘साई’ पक्ष महापौरपदाच्या स्पर्धेत किंगमेकर ठरणार होता. त्यामुळे भाजपने ‘साई’ पक्षालाच आपल्यात विलीन करुन घेण्याचा ‘गेम’ खेळला. उपमहापौरपदावर असलेल्या ‘साई’ पक्षाच्या जीवन इदनानी यांना महापौरपदाची ऑफरही भाजपने दिली होती. परंतु ऐनवेळी बाजी पलटली आणि शिवसेनेच्या नगरसेविका लीलाबाई आशन महापौरपदी विराजमान झाल्या.

महापालिकेत एकूण 78 नगरसेवक असून 40 ही मॅजिक फिगर आहे. त्यात भाजपचे सर्वाधिक 32, तर शिवसेनेचे 25 नगरसेवक आहेत. सध्याची राजकीय पार्श्वभूमी पाहता शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतरांचा पाठिंबा मिळणं साहजिक होतं. त्यानंतरही शिवसेनेची संख्या भाजपइतकीच म्हणजे 32 वर जात होती. परंतु टीम ओमी कलानीच्या पाठिंब्यावर महासेनाआघाडीला बहुमत गाठण्यात यश आलं. कोल्हापूरपाठोपाठ उल्हासनगरमध्येही महासेनाआघाडीचा विजय झाला.

उल्हासनगर महापौरपद : भाजपचा शिवसेनेला शह, ‘किंगमेकर’ पक्ष विलीन

गेल्या अडीच वर्षांपासून उल्हासनगर महापालिकेत भाजप आणि साई पक्षाची सत्ता आहे. मात्र तरीही साई पक्षाने स्वतंत्रपणे महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. भाजपच्या तिकीटावर लढलेल्या पप्पू आणि ज्योती कलानी यांच्या स्नुषा, ओम कलानी यांच्या पत्नी पंचम कलानी उल्हासनगरच्या महापौर होत्या. परंतु कलानी गटाने आता सेनेच्या पारड्यात मत टाकलं.

आमच्याशिवाय सत्तास्थापन करता येणार नाही, अशी भाजपची गुर्मी होती. मात्र आम्ही त्यांचा माज उतरवला. आमच्यावर भाजपने दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्हाला फरक पडत नाही. आम्ही व्हीप झुगारुन विरोधात मतदान केलं. ज्यांना जे करायचं असेल ते करावं, असं ओमी कलानी म्हणाले.

भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करताना मित्रपक्ष असलेल्या ओमी कलानी गटाचे नगरसेवक मात्र सोबत नव्हते, तेव्हाच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. परंतु कलानी गट आपल्यासोबत असल्याचा दावा करणारं भाजप महापौरपदाच्या निवडणुकीत तोंडघशी (Ulhasnagar Shivsena Mayor) पडलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *