राज्यपाल नियुक्त आमदार : सर्वात मोठा ट्विस्ट, शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकरच्या नावाची चर्चा

| Updated on: Oct 29, 2020 | 6:01 PM

उर्मिला मातोंडकर यांची विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त जागेवर शिवसेनेकडून नियुक्ती होण्याची शक्यता आहे

राज्यपाल नियुक्त आमदार : सर्वात मोठा ट्विस्ट, शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकरच्या नावाची चर्चा
Follow us on

मुंबई : प्रख्यात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांची विधानपरिषदेवर नियुक्ती होण्याची शक्यता आहे. राज्यपाल नियुक्त कोट्यातून शिवसेनेच्या तिकीटावर मातोंडकर यांना आमदारकी मिळण्याची चिन्हं आहेत. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरुन उर्मिला मातोंडकर यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे. (Urmila Matondkar may contest from Shivsena for Governor elected Vidhan Parishad MLC)

उर्मिला मातोंडकर यांची विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त जागेवर शिवसेनेकडून नियुक्ती होण्याची शक्यता आहे. उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसच्या तिकीटावर गेल्या वर्षी लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा भाजप नेते गोपाळ शेट्टी यांच्याकडून पराभव झाला होता.

उर्मिला यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेसला रामराम ठोकला. त्यानंतर शिवसेनेशी त्यांची जवळीक वाढली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरुन उर्मिला मातोंडकर यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर शिवसेनेकडून उर्मिला यांची विधीमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे संसदेत जाता-जाता राहिलेल्या उर्मिला विधीमंडळात प्रवेश करणार का, याची उत्सुकता आहे.

काँग्रेसवर आगपाखड करुन सोडचिठ्ठी

मुंबई काँग्रेसच्या भल्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी अंतर्गत राजकारण सोडवण्यासाठी काँग्रेसने माझ्या प्रतिमेचा गैरवापर करुन घेतला, असा दावा करत उर्मिला मातोंडकर यांनी अवघ्या सहा महिन्यात पक्षाला सो़डचिठ्ठी दिली होती.

45 वर्षीय उर्मिला मातोंडकर यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. उर्मिला यांचे रंगीला, प्यार तुने क्या किया, भूत, कौन यासारखे असंख्य चित्रपट गाजले आहेत. उर्मिला यांच्या डान्सचेही चाहते आहेत. त्यांनी काही रिअॅलिटी शोंचं परीक्षणही केलं आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून त्या बॉलिवूडमध्ये फारशा दिसल्या नव्हत्या. काही वर्षांपूर्वी ‘आजोबा’ या मराठी चित्रपटात त्या झळकल्या.

राजकारणातून आपली सेकंड इनिंग सुरु करणाऱ्या उर्मिला यांनी अकाली राजकीय एक्झिट घेतल्याची चर्चा होती. आता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास ‘मराठी मुलगी’ मराठी माणसाच्या अस्मितेसाठी काम करेल, अशी अपेक्षा चाहते व्यक्त करत आहेत.

शिवसेना-राष्ट्रवादीकडून कोणाकोणाची नावं चर्चेत?

शिवसेना

सुनील शिंदे – वरळीचे माजी आमदार, आदित्य ठाकरेंसाठी जागा सोडली

आदेश बांदेकर – शिवसेना नेते, श्रीसिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष (राज्यमंत्रिपद दर्जा), 2009 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकीटावर माहिममधून पराभव

सचिन अहिर – 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश, माजी आमदार, आदित्य ठाकरेंच्या विजयात मोठा वाटा मानला जातो, त्याची बक्षिसी म्हणून विधानपरिषद आमदारकी मिळण्याची शक्यता

शिवाजीराव आढळराव-पाटील – सलग तीन वेळा शिरुरचे खासदार, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले नेते डॉ. अमोल कोल्हेंकडून पराभव, आमदारकीतून राजकीय पुनर्वसन होण्याची चिन्हं

वरुण सरदेसाई – युवासेना सरचिटणीस

राहुल कनाल – युवासेना पदाधिकारी

वरुण सरदेसाई यांच्यासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे प्रयत्नशील असल्याचे म्हटले जाते

(Urmila Matondkar may contest from Shivsena for Governor elected Vidhan Parishad MLC)

राष्ट्रवादी

एकनाथ खडसे – भाजपचा राजीनामा देत नुकतेच राष्ट्रवादीत आगमन, राजकीय पुनर्वसनासाठी आमदारकी जवळपास निश्चित

शिवाजी गर्जे – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस, माजी सनदी अधिकारी असलेले गर्जे हे शरद पवार यांच्या मर्जीतील मानले जातात

आदिती नलावडे – मुंबई संघटक आणि सोशल मीडिया सेलच्या प्रमुख, माजी विधानसभा अध्यक्ष व शिवसेनेचे नेते दिवंगत दत्ताजी नलावडे यांच्या पुतणी, सुप्रिया सुळे यांच्या निकटवर्तीय

सूरज चव्हाण – राष्ट्रवादी पदाधिकारी

राजू शेट्टी – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे नाव जवळपास निश्चित मानले जाते

आनंद शिंदे – प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांची विधानपरिषदेवर वर्णी निश्चित मानली जाते

राज्यपाल नियुक्त विधान परिषद आमदारांसाठी निकष काय?

कला, वाङ्मय, विज्ञान, सहकारी चळवळ आणि सामाजिक कार्य अशा क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींची राज्यपाल विधान परिषदेवर नियुक्ती करु शकतात. तज्ज्ञांच्या अनुभवाचा राज्याला फायदा व्हावा, यासाठी विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहात दिग्गजांची नियुक्ती करण्याची घटनेत तरतूद आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेत 12 सदस्य नियुक्त करण्याचे राज्यपालांना अधिकार आहेत. मंत्रिमंडळाकडून शिफारस करण्यात आलेली नावे राज्यपालांकडून स्वीकारली जातात. मात्र सध्या राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारचे संबंध पाहता तिन्ही पक्षांनी शिफारस केलेल्या नेत्यांची वर्णी सहजासहजी लागणे दुरापास्त मानले जाते.

संबंधित बातम्या :

राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार : बड्या नेत्यांना मागे सारुन काँग्रेसकडून गीतकाराचे नाव निश्चित?

राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार : काँग्रेसच्या तिघा नेत्यांवर हायकमांडचे शिक्कामोर्तब, कोणाकोणाची वर्णी?

(Urmila Matondkar may contest from Shivsena for Governor elected Vidhan Parishad MLC)