राज्यात इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरासोबतच हरित उर्जानिर्मितीस चालना : आदित्य ठाकरे

| Updated on: Jan 11, 2021 | 6:40 PM

पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने राज्यात इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरासोबतच हरित उर्जेच्या निर्मितीला चालना देण्यात येईल, असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय.

राज्यात इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरासोबतच हरित उर्जानिर्मितीस चालना : आदित्य ठाकरे
Follow us on

मुंबई : पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने राज्यात इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरासोबतच हरित उर्जेच्या निर्मितीला चालना देण्यात येईल. तसंच इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरासोबतच हरित उर्जानिर्मितीस चालना देणार असल्याची ग्वाही पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. (use of electric vehicles in the state, green energy generation will be promoted says Aditya Thackeray)

राज्यातील महामार्ग सौरउर्जेवर आणणे, मुंबईतील बेस्टमध्ये पुढील पाच वर्षात साधारण 30 टक्के इलेक्ट्रीक बसेस आणणे यासह विविध उपाययोजना राबवून पर्यावरण संवर्धनास चालना देण्यात येईल. हवेचे प्रदुषण कमी करण्याच्या अनुषंगाने शासनामार्फत इलेक्ट्रीक वाहनांना येत्या काळात प्रोत्साहन दिले जाईल, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

राज्य शासनाच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळामार्फत सद्याद्री राज्य अतिथीगृह येथे आज इलेक्ट्रीक वाहन तंत्रज्ञानाच्या जलद अवलंबनासाठी आणि महाराष्ट्र वाहन धोरणामध्ये सुधारणा करण्यासाठी विविध भागधारकांसमवेत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.

जगात उत्तर किंवा दक्षिण ध्रुवावर वाढत्या तापमानामुळे बर्फ वितळला किंवा तापमानात बदल झाला तरच अशा वेळी त्याला आपण हवामानातील बदलाचे परिणाम असल्याचे म्हणतो, पण आपल्याकडे येणारे महापूर, दुष्काळ, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, वादळे हे सुद्धा वातावरणातील बदलाचेच परिणाम आहेत. राज्यात मागील एका वर्षात या आपत्तीग्रस्तांना 13 हजार कोटी रुपयांच्या मदतीचे वाटप करण्यात आले. यापुढील काळात पर्यावरणातील बदलांमुळे येणाऱ्या अशा आपत्ती रोखण्यासाठी पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने व्यापक मोहीम हाती घ्यावी लागेल, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने मोहिमेचा एक भाग म्हणून पुढील 5 वर्षात राज्यात इलेक्ट्रीक वाहने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

आपल्याला ई-मोबिलीटीवर जायचे असेल तर मोठ्या प्रमाणात वीजेची गरज भासणार आहे. पण विजेची गरज भागवताना ती हरित उर्जा कशी असेल यावर लक्ष द्यावे लागेल. एसटीमध्ये सध्या इंधनावर सुमारे 3 हजार कोटी रुपयांचा खर्च होतो. पण इलेक्ट्रिक बसेस वापरल्यास या खर्चात मोठी बचत होणार आहे. सध्या एसटी संकटात असून त्याला वाचविण्यासाठी ‘गो ग्रीन’कडे वळल्याशिवाय पर्याय नाही. याअनुषंगाने येत्या काळात एसटीमध्येही इलेक्ट्रीक बसेसच्या वापराला चालना देण्यात येईल, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले.

(use of electric vehicles in the state, green energy generation will be promoted says Aditya Thackeray)

हे ही वाचा

Corona vaccine: लसीबाबत शंका, पंतप्रधानांनी आधी स्वत:ला लस टोचून घ्यावी : राष्ट्रवादी

कोरोना लसीच्या वाहतुकीसाठी पुण्यात खास ट्रक्स; उद्या पहाटे लसीची पहिली खेप होणार रवाना?