कोरोना लसीच्या वाहतुकीसाठी पुण्यात खास ट्रक्स; उद्या पहाटे लसीची पहिली खेप होणार रवाना?

कुल एक्स कोल्ड चेन लिमिटेडकडून सीरम कंपनीतून देशाच्या अन्य भागांत लसीची वाहतूक केली जाणार आहे. | Kool ex Cold Chain Ltd in Pune

कोरोना लसीच्या वाहतुकीसाठी पुण्यात खास ट्रक्स; उद्या पहाटे लसीची पहिली खेप होणार रवाना?

पुणे: राज्यात लवकरच कोरोनाच्या लसीकरणाला (Vaccination) सुरुवात होणार आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सोमवारी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्त्वाची बैठक पार पडली. त्यामुळे महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी कोरोना लसीकरणाच्या प्रक्रियेला प्रारंभ होईल. या पार्श्वभूमीवर कोरोनाची लस तयार होत असलेल्या पुण्यात लसीच्या वाहतुकीसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. (Cold Chain trucks prepared to transport the COVID19 vaccines from Serum)

कुल एक्स कोल्ड चेन लिमिटेडकडून सीरम कंपनीतून देशाच्या अन्य भागांत लसीची वाहतूक केली जाणार आहे. त्यासाठी कंपनीकडून तापमान नियंत्रित करण्याची क्षमता असलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले ट्रक्स सज्ज ठेवण्यात आले आहेत. कुल एक्स कोल्ड चेन लिमिटेड ही कंपनी गेल्या 12 वर्षांपासून या क्षेत्रात आहे. या कंपनीच्या अत्याधुनिक ट्रक्समध्ये उणे 25 अंश ते + 25 अंश सेल्सिअस यादरम्यान तापमान नियंत्रित करण्याची सुविधा आहे. तसेच प्रत्येक ट्रक हा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहे. कोरोना लसीच्या वाहतुकीदरम्यान या ट्रक्सना संबंधित राज्याच्या पोलिसांकडून सुरक्षा पुरवली जाईल, अशी माहिती कुल एक्सचे संचालक कुणाल अग्रवाल यांनी दिली.

‘सीरम’च्या लसीला परवानगी मिळाल्याचे संकेत मिळाल्यानंतर गेल्या महिनाभरापासून कुल एक्स कोल्ड चेन लिमिटेडकडून लस वितरणासाठी जोरदार तयारी सुरु आहे. भारतात कुठेही लस वितरीत करण्यासाठी सज्ज राहा, असे आम्हाला सांगण्यात आले होते. सध्याच्या घडीला आमच्याकडे 300 ते 350 ट्रक सज्ज आहेत. याशिवाय, वेळ पडल्यास आणखी 500 ते 600 ट्रक्सची व्यवस्था करण्यात येईल. आदेश मिळाल्यानंतर आम्ही तातडीने लसींचा साठा ट्रक्समध्ये लोड करायला सुरुवात करु, अशी माहिती कुल एक्सचे सहसंचालक राहुल अग्रवाल यांनी दिली.

लसीकरणासाठी पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्र्यांची बैठक

येत्या 16 जानेवारीपासून देशात लसीकरण मोहीमेला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीत लसीकरण मोहीम कशी अंमलात आणायची, याविषयी चर्चा झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या लसीकरणाच्या अभियानाला देशातील सर्वात मोठं लसीकरणाचं अभियान म्हटलं आहे. यात प्राथमिक टप्प्यात तीन कोटी आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन कार्यकर्त्यांना लस देण्यात येणार आहे. यासाठीच पंतप्रधान मोदी आज सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत आहेत.

(Cold Chain trucks prepared to transport the COVID19 vaccines from Serum)

Published On - 5:26 pm, Mon, 11 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI