वंचित आघाडीसोबत आमची युती होऊ शकते, पण…मनोज जरांगे पाटील यांचं मोठं विधान काय?
मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांची वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भेट घेतल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरण तयार होणार असल्याचे म्हटले जात आहे. वंचितची मनोज जरांगे पाटील यांच्याशी युती होणार का ? याबाबत उत्सुकता लागली आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचे अखेर महाविकास आघाडीसोबत फाटले आहे. आता वंचित बहुजन विकास आघाडीने मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन राज्यात नवीन समीकरणाची बीजे पेरली आहेत. याला कितपत फळ येणार हे येणारा काळच ठरविणार आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील वंचित आघाडी सोबत आमची युती झाली तर राज्यातील राजकारणाला वेगळी दिशा मिळणार असल्याचे म्हटले आहे. या दोन नेत्यांच्या बैठकीत नेमकी काय बोलणी झाली आहेत. हे अद्याप नीट कळलेले नाही. तरी येत्या काही दिवसात या नव्या युतीबद्दल सत्य बाहेर येईल असे म्हटले जात आहे.
राज्य सरकारने मराठ्यांना 10 टक्के आरक्षण जाहीर केल्यानंतरही मनोज जरांगे यांनी आम्ही दहा टक्के आरक्षण मागितलेच नव्हते अशी भूमिका घेत ओबीसीतूनच आरक्षण मिळावे अशी मागणी कायम ठेवली आहे. तसेच सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी असे म्हटले होते. त्यानंतर शेकडो मराठा उमेदवारांना लोकसभा उतरविण्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. परंतू नंतर ही योजना मागे पडली. आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. आंबेडर साहेबांची आमची भेट झाली, पण आमचा निर्णय 30 तारखेला होणार आहे. त्यानंतर आम्ही निर्णय घेणार असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
30 तारखेला निर्णय घेणार
प्रकाश आंबेडकर यांच्याशी बैठक झाली, साहेबानी विषय सविस्तर मांडला, पण आमचा निर्णय 30 तारखेला होणार. त्यानंतर पुन्हा भेटणार आहोत. अद्याप आम्ही कुणालाही पाठिंबा दिलेला नाही, पाठिंबा आणि उमेदवार आम्ही 30 तारखेला ठरवणार आहोत. मी आधीच कुणाला पाठिंबा देणार नाही, फसवणार नाही. आमची युती होऊ शकते. पण निर्णय 30 तारखेला आम्ही घेणार आहोत असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
खूप मोठ्या उलथापालथ
समाजकारणात एक मत आणि राजकारणात बहुमत, जर आमच्या समाजाचा होकार आला, तर 30 तारखेला खूप मोठ्या उलथापालथ होणार आहेत. आम्ही पाच सहा जाती एकत्र येणार आहोत, मराठा मुस्लिम धनगर आणि दलित बांधव आम्ही एकत्र येणार आहोत. आतापर्यंत माझ्या समाजाची मते आणि जात ग्राह्य धरली जात नव्हती, 70 वर्षात आमच्या जातीला गृहीत धरले नव्हते असे जरांगे पाटील यावेळी म्हणाले.