माढ्यातून शरद पवार उतरल्यास काय होईल?

माढ्यातून शरद पवार उतरल्यास काय होईल?

माढा (सोलापूर) : लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं सांगत लोकसभा निवडणुकीपासून संन्यास घेतलेल्या  राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी यू-टर्न घेत, माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबाबत विचार करु, असे सूचक वक्तव्य केल्यामुळे शरद पवारच निवडणूक लढवणार असं जवळपास निश्चित झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे खुद्द शरद पवार निवडणुकीत उतरणार असल्याने  राज्यभरातील राष्ट्रवादीच्या नेत्यात उत्साह असला, तरी  मोदी लाटेत सुद्धा राष्ट्रवादीचा गड सांभाळणारे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचा पत्ता कट होणार आहे. त्यामुळे मोहिते-पाटील समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. मात्र या साऱ्या प्रकारात राजकारणात कोणी कोणाचं नसतं असे म्हटले जाते याची प्रचिती येते आहे. त्यामुळे मोहिते पाटील आता बंडाचे निशाण दाखवणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

पंढरपूर लोकसभा मतदार संघाचे 2009 मध्ये विभाजन होऊन माढा लोकसभा मतदारसंघाची  निर्मिती झाली. 35 वर्षे राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या पंढरपूर मतदारसंघाच्या विभाजनानंतर माढा संघाच्या निर्मितीनंतरचा पहिला खासदार कोण याची चर्चा रंगलेली असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी ही निवडणूक लढविली आणि त्यामुळे देशभरात माढा मतदारसंघाकडे लक्ष लागले. बड्या नेत्याने इथून निवडणूक लढवणार यामुळे मतदारसंघाचे महत्व वाढले. सिंचनाच्या अपुऱ्या योजना, बेरोजगारी, रस्ते, वीज पाणी अशा गोष्टींनी त्रास झालेल्या नागरिकांना माढाचे बारामती करु  आश्वासन पवारांनी दिले आणि पवार हे मोठ्या फरकाने निवडूनही आले. मात्र 2014 साली देशभरात मोदी लाटेची हवा सुरु असताना माढा मतदार संघातून निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेत राज्यसभेवर शरद पवार निवडून आले. माढा लोकसभा मतदारसंघात विजयसिंह मोहिते पाटलांना देण्यात आली. या मोहिते पाटलांनी मोदी लाटेत सुद्धा अटीतटीच्या निवडणुकीत आपला गड  राखत विजयश्री राखून आणला. तर माढा लोकसभा मतदार संघाची उमेदवारी मोहिते पाटलांना देऊन आपण कधीच लोकसभा आता निवडणूक लढणार नाही असा निर्णय माध्यमांना बोलून दाखवला होता. मात्र आता पवारांनी माढा मतदार संघातून निवडणूक लढविण्याचा विचार करु, असे सूचक वक्तव्य करून राजकीय भूकंप केलाय. त्यामुळे मोहिते पाटील समर्थकांत कमालीची नाराजगी पसरली आहे.

माढा लोकसभा : मोदी लाटेतही टिकलेले मोहिते-पाटील पुन्हा गड राखणार?

विजयसिंह मोहिते पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे जणू सोलापूर जिल्ह्याचे समीकरण. गावातील ग्रामपंचायती पासून पंचायत समिती, जिल्हा परिषदेवर विजयसिंह मोहिते पाटलांचाच दबदबा. मात्र, 2009 साली विजयसिंह मोहिते पाटलांचा पंढरपुरात झालेला पराभव हा त्यांचे खच्चीकरण करणारा ठरला. पक्षातील गटबाजीमुळेच त्यांना पराभवाला सामोरे जावे लागल्याची उघडउघड चर्चा मोहिते पाटलांच्या पराभवानंतर झाली. त्यानंतर देशभरात मोदी लाटेचा प्रभाव असतानाही माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील यांनी पक्षांतर्गत गटबाजीला छेद देत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची लाज राखली होती. त्यानंतर लोकसभा मतदारसंघात त्यांनी चांगले वर्चस्व निर्माण केले आहे. मात्र आता पुन्हा खुद्द शरद पवारांच्या राजकीय महत्वाकांक्षेने मोहिते पाटलांची उमेदवारी धोक्यात आलीय…

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिपक साळुंखे, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख आदींनी मोहिते पाटलांविरोधात शड्डू ठोकलेत. तर राष्ट्रवादीचेच माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांचेही कडवे आव्हान मोहिते पाटलांना आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी दिल्यास हे सर्व कार्यकर्ते पक्षाच्याविरोधात जाऊन पक्षाचा हक्काचा मतदारसंघ असलेली जागा गमवायला भाग पाडतील असा युक्तिवाद मोहिते पाटील विरोधकांनी केलाय. मात्र असं असलं तरी मोहिते पाटील समर्थक पवारांच्या निर्णयावर नाराज आहेत. कॉंग्रेसकडून मुख्यमंत्रिपदाची ऑफर असतानाही विजयसिंह मोहिते पाटलांनी ती नाकारत शरद पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याचे कार्यकर्ते सांगतात. त्यामुळे उमेदवारी विजयसिंह मोहिते पाटलांनाच मिळणार असल्याचे सांगत आहेत.

शरद पवार माढा लोकसभा निवडणूक लढवणार?

विजयसिंह मोहिते पाटील बंड करणार?

शरद पवार माढातून निवडणूक लढविणार असल्याने विजयसिंह मोहिते पाटलांचा पत्ता कट झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे सातत्याने होणाऱ्या खच्चीकरणामुळे विजयसिंह मोहिते पाटील प्रत्यक्ष बंड करण्याची शक्यता नाही. मात्र सहकारमंत्री सुभाष देशमुख किंवा अन्य भाजप उमेदवाराला साथ देण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शरद पवार माढ्यातून उभे राहिल्यास त्यांनाही धडा शिकण्याची कुजबूज मोहिते पाटील समर्थकांकडून होताना दिसते आहे. मात्र असं असताना 2014 साली शरद पवारांनी राजकीयदृष्ट्या सेफ गेम खेळत लोकसभा न लढविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता मोदी लाट ओसरल्याचे पाहून त्यांनी पुन्हा एकदा लोकसभेचा मार्ग धरलाय. अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI