पाकिस्तानातून आलेल्या प्रत्येक निर्वासिताला नागरिकत्त्व दिल्याशिवाय राहणार नाही : अमित शाह

काँग्रेस आणि विरोधीपक्ष हे नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे.

पाकिस्तानातून आलेल्या प्रत्येक निर्वासिताला नागरिकत्त्व दिल्याशिवाय राहणार नाही : अमित शाह

भोपाळ : काँग्रेस आणि विरोधीपक्ष हे नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (CAA) देशात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे (Amit Shah On CAA). या लोकांना धडा शिकवा असं आवाहनही शाहांनी जनतेला केला. तसेच, काँग्रेसने कितीही विरोध केला तरी पाकिस्तानात अत्याचार सहन करुन आलेल्या प्रत्येकाला भारतीय नागरिकत्त्व दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असंही अमित शाह म्हणाले (Amit Shah On CAA).

मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये CAA समर्थनात रविवारी एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अमित शाह यांनी CAA ला विरोध करणाऱ्यांवर निशाणा साधला. “देश स्वतंत्र झाला तेव्हा मोठ्या प्रमाणात लोक पाकिस्तानात राहून गेले होते. त्यांच्यावर आत्याचार करण्यात येत आहेत. पाकिस्तानातील हिंदूंची संख्या कमी होत चालली आहे. हा कायदा कुणाचं नागरिकत्त्व हिरावून घेण्यासाठी नाही तर नागरिकत्त्व देण्यासाठी आहे”, असं यावेळी अमित शाह म्हणाले.

“काँग्रेस आणि इतर पक्ष देशात गैरसमज पसरवत आहेत. दंगे भडकवण्याचं काम करत आहेत. काँग्रेसने कितीही विरोध केला, तरी पाकिस्तानातून यातना सोसून आलेल्या प्रत्येकाला भारतीय नागरिकत्त्व दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही”, असं म्हणत अमित शाहांनी काँग्रेसवर घणाघात केला. “महात्मा गांधींनीही म्हटलं होतं, पाकिस्तानात असलेले अल्पसंख्यांकांना जर भारतात यायचं असेल, तर ते येऊ शकतात, भारत त्यांची काळजी घेईल. सर्व नेत्यांनी हे म्हटलं होतं, पण, राहुल गांधी हे मानायला तयार नाहीत”, असंही शाह म्हणाले.

“राहुल गांधी, ममता बनर्जी, अरविंद केजरीवाल ने CAA चा विरोध करत आहेत. असे लोक जे राष्ट्रवादी अजेंडाचा विरोध करत आहेत त्यांना धडा शिकवला पाहिजे”, असं आवाहन अमित शाहांनी उपस्थित जनतेला केलं.

विरोधकांकडून पसरवण्यात येणाऱ्या गैरसमजला संपवण्यासाठी भाजपला जनजागृती अभियान सुरु करावं लागलं. कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन कलम 370 रद्द करणे, राम मंदिर आणि CAA बाबत लोकांमधील गैरसमज दूर करा, अशा सूचना अमित शाह यांनी कार्यकर्त्यांना यावेळी केल्या.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI