सुजय विखेंचं भाषण त्यांच्याच शब्दात, जसंच्या तसं

मुंबई : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. डॉ. सुजय विखे पाटील यांचा भाजपमधील प्रवेश हा काँग्रेससाठी जबर धक्का मानला जात असून, भाजपने विरोधी पक्षनेत्याच्या घरातच खिंडार पाडली आहे. सुजय विखेंचं भाषण जसंच्या तसं : सर्वात …

सुजय विखेंचं भाषण त्यांच्याच शब्दात, जसंच्या तसं

मुंबई : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. डॉ. सुजय विखे पाटील यांचा भाजपमधील प्रवेश हा काँग्रेससाठी जबर धक्का मानला जात असून, भाजपने विरोधी पक्षनेत्याच्या घरातच खिंडार पाडली आहे.

सुजय विखेंचं भाषण जसंच्या तसं :

सर्वात प्रथम मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मनातो. कारण त्यांनी मला अधिकृत भाजपमध्ये एक कार्यकर्ता म्हणून काम करण्याची संधी दिली. अनेक चर्चा, तर्क-वितर्क या प्रवेशाबाबत गेल्या एक महिन्यापासून मी पाहत होतो. मला आज आनंद वाटतो की, अतिशय सन्मानाने आणि मुलगा म्हणून या सर्व ज्येष्ठ मंत्री आणि आमदारांनी पक्षामध्ये जागा दिली. सगळ्यांचे आभार मानतो.

खरंतर अनेक दिवसांपासून हा विचार मनात येत होता. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या सुरक्षेसाठी ज्याप्रकारे निर्णय घेण्याची क्षमता दाखवली आणि अनेक असे निर्णय घेतले. त्यामुळे त्यावरुन प्रभावित होऊन, आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला की, भाजप हाच आपल्या पुढील वाटचालीसाठी योग्य पक्ष असेल.

मोदींचं नेतृत्त्व आपल्यातील नेतृत्त्वाला ओळखू शकेल. म्हणून नरेंद्र मोदी यांचं नेतृत्त्व स्वीकारण्याचा आम्ही निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत वैयक्तिक सांगतो की, एवढ्या मोठ्या पदावर बसलेल्या एक व्यक्तीने ज्याप्रकारे मला मान-सन्मान दिला, मला वाटतं माझ्या वडिलांची जागा त्यांनी त्या ठिकाणी राहून बजावली. राजकारणामध्ये अनेक प्रश्न मला विचारले. पण मी एवढेच सांगतो की, माझ्या संकटाच्या काळात, ज्या व्यक्तीने मला आधार देण्याचं काम केलं, ज्या व्यक्तीने मला आशीर्वाद दिले, माझा पूर्ण प्रवास त्या व्यक्तीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिले. मुख्यमंत्री आणि इतर सर्व पदाधिकाऱ्यांना शब्द देतो, नगर जिल्ह्यामध्ये भाजपच्या वाढीसाठी आमदारांच्या मदतीने डॉ. सुजय विखे पाटील सुद्धा करणार.

आज हा निर्णय घेताना, माझ्या वडिलांच्या विरुद्ध जाऊन निर्णय घ्यावा लागला. वडिलांच्या इच्छेविरुद्ध निर्णय घ्यावा लागला. माझ्या आई आणि वडिलांची किती सहमती आहे, मला माहिती नाही. अशा कुटुंबाला विरुद्ध जाऊन, मी निर्णय घेत असताना, माझ्यावर फार मोठी जबाबदारी आहे. माझ्या कुटुंबाचं नाव आज वेगवेगळ्या ठिकाणी घेतलं जात आहे. मात्र, भाजपची भूमिका ही डॉ. सुजय विखे पाटील यांची वैयक्तिक भूमिका आहे.

पुढील वाटचालीसाठी भाजपच्या वाढीसाठी मी आणि माझे कार्यकर्ते अहोरात्र काम करतील. येणाऱ्या निवडणुकीत नगर जिल्ह्यातील दोन्ही खासदार युतीचे असतील, असा शब्द मी आपल्याला देतो. आम्ही आजपासून भाजपचे कार्यकर्ते म्हणून या पक्षाच्या वाढीसाठी प्रामाणिकपणे काम करु, एवढेच आश्वासन देतो आणि थांबतो.

मुख्यमंत्री साहेब, आमच्या लोकांना सवय आहे की, सुजयदादाचे नारे द्यायचे. भाजपचे नारे द्यायला अजून थोडा वेळ लागेल. हळूहळू त्यांना त्यामध्ये रुजू करावं लागेल. मीच घोषणा देऊन, माझ्यापासूनच सुरु करतो.

सुजय विखेंचा भाजपमध्ये प्रवेश

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, नगरचे पालकमंत्री राम शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह दिग्गज भाजप नेत्यांच्या उपस्थितीत सुजय विखेंचा भाजपमध्ये प्रवेश झाला. यावेळी सुजय विखेंच्या पत्नी धनश्री विखे पाटीलही हजर होत्या.

मुंबईतील वानखेडे स्टेडियममधील गरवारे क्लबमध्ये सुजय विखे पाटलांच्या प्रवेशाचा सोहळा पार पडला. ‘एकच वादा, सुजय दादा’ अशा घोषणा देत गरवारे क्लब सुजय विखेंच्या कार्यकर्त्यांनी दणाणून सोडला. नगरमधून मोठ्या संख्येत सुजय विखेंचे समर्थक या सोहळ्यासाठी मुंबईत आले होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *