इतके वर्ष उगाच दूर होतो, अनेक वर्ष वाया घालवली : उद्धव ठाकरे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Shivneri) यांनी शिवनेरी किल्ल्यावर जाऊन अभिवादन केलं.

Uddhav Thackeray Shivneri, इतके वर्ष उगाच दूर होतो, अनेक वर्ष वाया घालवली : उद्धव ठाकरे

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Shivneri) यांनी शिवनेरी किल्ल्यावर जाऊन अभिवादन केलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राज्यमंत्री दत्ता भरणेही उपस्थित होते. शिवजयंतीनिमित्त (Uddhav Thackeray Shivneri) असंख्य शिवभक्तांनी किल्ले शिवनेरीवर हजेरी लावली.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “आज आम्ही मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री म्हणून नव्हे तर शिवभक्त म्हणून याठिकाणी आलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे. ज्यावेळी देशावर हिरवं संकट आले होतं, त्यावेळी त्याच्या चिंधड्या करण्याचं काम छत्रपतींनी केलं.  आमचे विचार भगवा आहे, आमच्या धमन्यात भगवा आहे”

शिवरायांच्या चरणी आज मी एकच मागितलं आहे, प्रत्येक क्षणी आणि प्रत्येक पाऊली आम्हाला तुमचं मार्गदर्शन राहू द्या. जनतेला अपेक्षित सरकार आल्यामुळे आज ही गर्दी दिसतेय, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

इतके वर्ष उगाच दूर होतो : उद्धव ठाकरे

दरम्यान यावेळी उद्धव ठाकरे यांनी राजकीय भाष्यही केलं. “इतके वर्ष उगाच दूर होतो. आता आम्ही एकत्र आल्यानंतर एवढी वर्ष उगाच घालवली असं वाटतंय.  मात्र आता आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आलो आहोत, सर्व चांगलं होईल”, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

शिवनेरी किल्ल्यासाठी आजच्या आज 23 कोटी : अजित पवार

आतापर्यंत जे लोकप्रतिनिधी आले, त्यांनी शिवनेरी विकासाचे काम केले. आज जी गर्दी बघतोय त्यावरून एक लक्षात येतंय त्यावरून राज्यात रयतेचं राज्य आलंय.  मराठा आंदोलकांवर जे गुन्हे दाखल झाले आहेत, ते मागे घेण्यासंदर्भात कायद्याच्या चौकटीत राहून लवकरच निर्णय घेऊ,  असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

मराठा आरक्षणाबाबतही कोर्टात सरकार भक्कम बाजू मांडेल. शिवनेरी किल्ल्याच्या विकासासाठी आजच्या आज 23 कोटी मंजूर केले, अशी माहितीही अजित पवारांनी दिली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *