Vastu Shastra : शनि देव नाराज का होतात? जाणून घ्या घरात शनिदोष का निर्माण होतो?
वास्तुशास्त्रानुसार शनि देव जेव्हा नाराज होतात, तेव्हा घरात शनिदोष निर्माण होतो. जर घरात शनिदोष निर्माण झाला तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. जसं की कामामध्ये अनेक प्रकारचे अडथळे निर्माण होतात. एखादं काम आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असतं, मात्र त्यामध्ये विलंब होतो. चला तर मग जाणून घेऊयात घरात शनिदोष का निर्माण होतो?

शनि देवांना कर्मफळ दाता म्हटलं आहे, शनि देव प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. त्यामुळे शनि देवांना न्याय देवता असं देखील म्हणतात. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कधीनं कधी शनिची साडेसाती येते. जेव्हा एखाद्या व्यक्तीला शनिची साडेसाती चालू असते, त्या काळात त्या व्यक्तीच्या आयुष्यात काही अडचणी निर्माण होतात. आरोग्याचे प्रश्न, अचानक एखादं मोठं आर्थिक संकट किंवा काहीही कारण नसताना घरात गृहकलह अशा समस्यांचा सामना या व्यक्तीला करावा लागतो. मात्र इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, जर या काळात व्यक्तीचे कर्म चांगले असतील तर शनि देव अशा व्यक्तीला त्रास देत नाहीत. शनिच्या साडेसातीनंतर या व्यक्तीला शनिदेव शुभ फळ देतात. जेव्हा शनिची साडेसाती सुरू असेल तेव्हा तुमच्या आयुष्यात काही अडचणी येण्याची शक्यता असते, अशावेळी शनि मंत्राचा जप करण्याचा सल्ला ज्योतिषशास्त्रात देण्यात आला आहे. अशा काही गोष्टी असतात, ज्यामुळे तुमच्या घरात शनिदोष निर्माण होतो. जसं की घराची पश्चिम दिशा ही शनि देवाची दिशा मानली जाते. जर तुमच्या घराची पश्चिम दिशा ही स्वच्छ नसेल तर तुमच्या घरात शनिदोष निर्माण होतो.
शनिदोषाची कारण कोणती?
पश्चिम दिशा ही शनिदेवाची आवडती दिशा असते, त्यामुळे तुमच्या घराची पश्चिम दिशा ही नेहमी स्वच्छ ठेवावी, कुठलंही भंगार सामान किंवा बंद पडलेलं घड्याळ, बंद पडलेल्या इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू या दिशेला ठेवू नयेत. या दिशेला जर कचरा असेल किंवा ही दिशा अस्वच्छ असेल तर शनि देव नाराज होतात. अशा घरात शनि दोष निर्माण होतो. एवढंच नाही तर घरात शनि देवाची मूर्ती किंवा प्रतिमा असू नये, त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पुराणानुसार शनि देवांची दृष्टी ही वक्र असते. त्यामुळे शनि देवाचं कधीही समोरून दर्शन घेतलं जातं नाही.शनि देवाचं दर्शन हे उजव्या किंवा डाव्या बाजुनं घ्यावं. त्यामुळे घरात शनि देवांची मूर्ती असू नये असं शास्त्र सांगतं.शनि देवाची दृष्टी थेट तुमच्यावर पडल्यास घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. जर एखाद्या घरात सतत वाद, आणि भांडणं होत असतील घरात शांतता नसेल तरी अशा घरात शनिदोष निर्माण होतो.
शनिदोष निवारणाचे उपाय
वास्तुशास्त्रानुसार दर शनिवारी शनि मंदिरात जाऊन शनि मंत्राचा जप करावा, शनि देवांना काळे तीळ आणि तेल अर्पण करावेत. शनि देवाची पूजा आणि प्रार्थना करावी. तसेच पिंपळाच्या झाडाखाली दररोज दिवा लावल्यास किंवा पिंपळाला प्रदक्षिणा मारल्यास देखील शनिदोष नष्ट होतो, शनि देव प्रसन्न होतात. दानाला खूप महत्त्व आहे. तुमच्या दारावर कोणीही आलं तरी त्याला दान करा. कोणालाही उपाशीपोटी दारातून माघारी जाऊ देऊ नका, शनि देवांची कृपादृष्टी सदैव तुमच्यावर राहील, सर्व प्रकारच्या दोषातून त्यामुळे तुमची मुक्तता होईल, तसेच जर घरात शनिदोष निर्माण झाल्यास नियमित भगवान हनुमंतांचं दर्शन घ्यावं. मारुती स्तोत्राचा जप करावा, त्यामुळे शनिदोषातून मुक्ती मिळते, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
