Vibhuvana Sankashti Chaturthi 2023 : तीन वर्षांतून एकदा ठेवले जाते हे व्रत, विधिवत करा गणेशाची उपासना, सर्व मनोकामना होतील पूर्ण
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची उपासना, पूजा केल्याने साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. श्रावण अधिक मासात विभुवन संकष्टी चतुर्थीचे व्रत ठेवण्यात येते. हे व्रत आज 4 ऑगस्ट रोजी आहे.

Vibhuvana Sankashti Chaturthi 2023 : अधिक मासात पूजा-पाठ, जपाचे आणि व्रत-वैकल्यांचे विशेष महत्व असते. शास्त्रात असे सांगण्यात आले आहे की पुरूषोत्तम मास किंवा अधिक मासात व्रत ठेवल्याने किंवा पूजा-पाठ केल्याने साधकाला विशेष लाभ मिळतो. अधिक मास (adhik month) हा तीन वर्षांतून एकदाच येतो. त्यामुळे या मासात येणारे सणही तीन वर्षांतून एकदाच साजरे केले जातात. त्यापैकीच एक म्हणजे विभुवन संकष्टी चतुर्थीचे व्रत (Vibhuvana Sankashti Chaturthi). हिंदू पंचागानुसार, हे व्रत श्रावण अधिक मासातील कृष्ण पक्षातील चतुर्थीच्या दिवशी ठेवले अथवा केले जाते. या विशेष दिनी गणेशाची उपासना केल्याने साधक अथवा भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात व त्यांना सुख, समृद्धि तसेच ऐश्वर्य यांचा आशीर्वाद मिळतो.
विभुवन संकष्टि चतुर्थी व्रत 2023 शुभ मुहूर्त
हिंदू पंचांगानुसार, श्रावण ‘आधिक’ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीची तिथी 4 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजून 45 मिनिटांनी सुरू होणार असून 5 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजून 49 मिनिटांनी ती समाप्त होईल. त्यामुळे शुक्रवार, 4 ऑगस्ट रोजी विभुवन संकष्टी चतुर्थी व्रत पाळण्यात येणार आहे. या विशेष दिनी चंद्र आणि गणपतीची पूजा करण्याचे महत्त्व आहे. या दिवशी चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर व्रताचे पारण होते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी रात्री 9 वाजून 20 मिनिटांनी चंद्रोदय होणार आहे. या विशेष दिवशी शोभन योग देखील तयार होत आहे, जो सकाळी 6 वाजून 14 मिनिटांपर्यंत असेल.
विभुवन संकष्टी चतुर्थी व्रतावर असेल पंचकाची सावली
वैदिक पंचागानुसार, विभुवन संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पंचक आणि भद्राची सावली असेल. या दिवशी भद्रा सकाळी 5 वाजून 44 मिनिटे ते दुपारी 12 वाजून 45 मिनिटांपर्यंत असेल आणि पंचक दिवसभर राहील. पण गणेशाच्या पूजेला पंचक वैध ठरणार नाही.
संकष्टी चतुर्थी पूजेचे विधी
– संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे. स्नान व ध्यान झाल्यावर जिथे पूजा करणार त्या जागेची नीट स्वच्छता करावी,
– पूजेच्या वेळी तुमचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे.
– त्यानंतर धूप-दीप प्रज्वलित करून व्रताचा संकल्प घ्यावा आणि गजाननाच्या चरणी दुर्वा, अक्षता, कूंकू इत्यादी वहावे.
– यावेळी ‘ॐ गणेशाय नमः’ किंवा ‘ॐ गं गणपतये नमः’ या मंत्राचा सतत जप करावा.
– पूजेच्या वेळेस गजाननाला लाडू किंवा तिळापासून बनलेल्या गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवा.
– संध्याकाळी व्रताच्या कथेच्या पाठाचे वाचन करावे आणि चंद्राला अर्घ्य देऊन व्रताचे पारण करावे.
विभुवन संकष्टी चतुर्थीच्या व्रताचे महत्व
विभुवन संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने भक्तांना सर्व संकटांपासून मुक्ती मिळते आणि त्यांना शक्ती, बुद्धी, ज्ञान आणि ऐश्वर्य प्राप्त होते, असे वर्णन शास्त्रात आहे. यासोबतच हे व्रत विधिवत पूर्ण केल्याने साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि कुंडलीत निर्माण होणारे अनेक प्रकारचे ग्रह दोष आणि समस्याही दूर होतात.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
