IND vs NZ : 15 महिन्यानंतर पहिली फिफ्टी मारताच सूर्यकुमार यादव गंभीर नाही, तर टीममधील या व्यक्तीच्या पाया पडला
IND vs NZ : रायपूर येथील दुसऱ्या टी 20 सामन्यात सूर्यकुमार यादवने दमदार बॅटिंग केली. 37 चेंडूत 82 धावा तडकावल्या. सूर्या त्याच्या या इनिंगनंतर हेड कोच गौतम गंभीर यांच्या नाही, तर टीम मधील दुसऱ्या व्यक्तीच्या पाया पडला.

अनेक दिवस, आठवडे, महिने, वर्षभरापासून ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते, प्रतिक्षा होती ते अखेर काल घडलं. टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव योग्यवेळी फॉर्ममध्ये परतलाय. न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या टी 20 सामन्यात सूर्यकुमार यादव स्फोटक इनिंग खेळला. त्याने झटपट 82 धावा फटकावून टीम इंडियाला विजय मिळवून दिला. मागच्या 15 महिन्यातील सूर्यकुमार यादवचं हे पहिलं अर्धशतक आहे. सूर्याच्या या इनिंगने टीम इंडिया आणि लाखो चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. स्वत: सूर्या सुधा मनोमन खूप सुखावला असेल. आपल्या फलंदाजीने सूर्याने सर्वांना खुश केलच. पण त्यानंतर त्याने जे केलं, त्याने सर्वांच मन जिंकलं. मॅच संपल्यानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव थ्रो-डाऊन स्पेशलिस्ट रघु यांच्या पाया पडला.
रायपूर येथे दुसऱ्या टी 20 सामन्यात टीम इंडियासमोर 209 धावांचं अवघड लक्ष्य होतं. या धावांचा पाठलाग करताना 6 रन्सवरच टीम इंडियाने अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन हे दोन मोठे विकेट गमावले होते. या अवघड परिस्थितीत इशान किशनने स्फोटक फलंदाजी करुन टीमच्या विजयाचा पाया रचला. त्याच्या नंतर कॅप्टन सूर्यकुमार यादव 37 चेंडूत 82 धावांची धुवाधार इनिंग खेळला. त्याने मॅचला फिनिशिंग टच दिला.
नेटमध्ये मेहनत करत होता
भारतीय कर्णधाराचं मागच्या 15 महिन्यातील हे पहिलं अर्धशतक होतं. याआधी बांग्लादेश विरुद्ध ऑक्टोंबर 2024 मध्ये अर्धशतक झळकावलं होतं. त्यानंतर तो सतत अपयशी ठरत होता. सूर्याच्या टीममधील स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत होतं. सूर्या आपल्या बाजूने नेटमध्ये मेहनत करत होता. या परिश्रमात त्याला हेड कोच गौतम गंभीर यांच्यासह दुसऱ्या कोचची सुद्धा साथ मिळाली. या काळात सूर्याची सर्वात जास्त मदत थ्रो-डाउन स्पेशलिस्ट रघु यांनी केली.
तिलक वर्माने सुद्धा असच केलं होतं
मॅच संपल्यानंतर सूर्याने गुरु गंभीर यांच्यासह दुसऱ्या खेळाडूंशी हँडशेक केलं. गळाभेट घेतली. पण रघु दिसताच सूर्या सर्वप्रथम त्यांच्या पाया पडला, आशीर्वाद घेतले. हे पाहून रघु सुद्धा हैराण झाले. लगेच त्यांनी सूर्यकुमारला उभं केलं व त्याची गळाभेट घेतली. काही आठवड्यांपूर्वी तिलक वर्माने सुद्धा असच काम केलं होतं. तो सुद्धा टीम इंडियाच्या विजयानंतर रघु यांच्या पाया पडला होता.
म्हणूनच मागच्या 10 वर्षांपासून टीमचा भाग
नेट्स मध्ये थ्रो-डाउनसह रघु आणि त्यांचे सहकारी सर्व फलंदाजांना प्रॅक्टिस देतात. ते आपल्या कामात इतके माहिर आहेत की, अनेकदा फलंदाजांसमोर अडचणी निर्माण करतात. फलंदाजांना मॅचसाठी तयार होण्यात मदत मिळते. भले ते आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत क्रिकेट खेळले नसतील, पण जगभरात नाव कमावणाऱ्या भारतीय फलंदाजांना ते तयार करतात. म्हणूनच ते मागच्या 10 पेक्षा जास्त वर्षांपासून टीम इंडियाचा भाग आहत.
