Bangalore Stampede : 5 लाख माणसं, पोलीस फक्त 10 हजार, बंगळुरूच्या चेंगराचेंगरीचा ट्रिगर पॉइंट कोणता? नेमकं काय चुकलं?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या सत्कार समारंभ कार्यक्रमात मोठी चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीत तब्बल 10 जणांचा मृत्यू झालाय.

Bangalore Stampede : यंदाच्या आयपीएल ट्रॉफीवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आपलं नाव कोरलंय. याच संघाच्या सत्कारासाठी बंगळुरूमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चिन्नास्वामी स्टेडियमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला मात्र गालबोट लागले आहे. या स्टेडियमच्या परिसरात मोठी चेंगराचेंगरी झाली असून तब्बल 10 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर ही चेंगराचेंगरी नेमकी कशी झाली? असं विचारलं जात आहे. तसेच प्रशासन नेमकं कुठं चुकलं याबाबतही अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत.
नेमकं काय घडलं?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा यंदाच्या आयपीएलमध्ये विजय झाल्यानंतर कर्नाटकमध्ये बंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर या संघातील खेळाडूंची मोठा सत्कार आयोजित करण्यात आला होता. याच सत्काराला अपेक्षेपेक्षा जास्त लोक आली. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला येणाऱ्यांत तरुण मोठ्या प्रमाणावर होते. लोकांनी स्टेडियम पूर्ण भरल्यामुळे बाहेरच्या चाहत्यांना आत सोडले जात नव्हते. त्यामुळे मैदानाच्या बाहेर लोकांमध्ये अस्वस्थता पसरली होती. पुढे हीच गर्दी नियंत्रणाबाहेर गेली आणि चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 30 लोक यात जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
नेमकं काय चुकलं?
मिळालेल्या माहितीनुसार या स्टेडियममध्ये एका वेळी 40 हजार प्रेक्षक बसू शकतात. पण प्रत्यक्षात मात्र या कार्यक्रमाला तब्बल 5 लाख लोक जमा झाले होते. याचाच अंदाज आयोजकांना आला नसल्याचा आरोप आता केला जात आहे.
पोलीस फक्त 10 हजार?
दुसरीकडे अपेक्षेपेक्षा जास्त लोक येतील हा अंदाज न आलेला नसल्यामुळे येथे पोलिसांचा फौजफाटादेखील कमी होता. मिळालेल्या माहितीनुसार पाच लाख लोकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी फक्त 10 हजार पोलीस तैनात करण्यात आले होते. त्यामुळेच गर्दी नियंत्रित करता आली नाही. परिणामी पुढच्याच काही वेळेत मोठी चेंगराचेंगरी झाली आणि तब्बल 10 जणांचा मृत्यू झाला आहे.
ट्रिगर पॉइंट कोणता ठरला?
जमा झालेल्या तरुणाईला बंगळुरूच्या संघाला पाहायचे होते. बंगळुरूच्या विजयात सहभागी व्हायचे होते. पण पोलीस स्टेडियममध्ये जाऊ देत नसल्याने गर्दी अनियंत्रित झाली आणि हाच चेंगराचेंगरीचा ट्रिगर पॉइंट ठरला.
उपमुख्यमंत्र्यांनी मागितली माफी
दरम्यान, या घटनेनंतर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी कर्नाटकच्या जनतेची माफी मागितली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आदेश दिले आहेत. एवढा मोठा जमाव झाला होता की त्यावर नियंत्रण मिळवणे सोपे नव्हते. आम्हाला खेळाडूंची विजयी मिरवणूक काढायची होती. पण गर्दी खूप झाली होती, असं डी के शिवकुमार यांनी सांगितलं आहे.
