Asia Cup Trophy 2025 : भारताने मेल केला, पण नक्वी आशिया ट्रॉफी देणार का? आता BCCI कडे कुठला पर्याय?

आशिया चषक 2025 स्पर्धेत भारताने पाकिस्तानला पराभूत केले. भारताचा विजय झालेला असला तरी भारतीय संघाला मात्र अद्याप जेतेपदाची ट्रॉफी मिळालेली नाही. त्यामुळेच भारताने आता मोठे पाऊल उचलले आहे.

Asia Cup Trophy 2025 : भारताने मेल केला, पण नक्वी आशिया ट्रॉफी देणार का? आता BCCI कडे कुठला पर्याय?
ASIA CUP TROPHY
Updated on: Oct 21, 2025 | 5:17 PM

Mohsin Naqvi Asia Cup Trophy 2025 : आशिया चषक 2025 स्पर्धा जिंकूनदेखील या स्पर्धेच्या जेतेपदाची ट्रॉफी भारताला मिळालेली नाही. आशियाई क्रिकेट परिषदेचे प्रमुख तथा पाकिस्तानी नेते मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी घेण्यास भारतीय संघाने नकार दिला होता. त्यानंतर नक्वी यांनी ही ट्रॉफी आशियाई क्रिकेट परिषदेच्या मुख्यालयात ठेवलेली आहे. दरम्यान, नक्वी भारताला ही ट्रॉफी द्यायला तयार नसल्याने भारताने आता कठोर पवित्रा घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने नक्वी यांना मेल करून थेट इशारा दिला आहे. या इशाऱ्यानंतरही नक्वी यांनी ट्रॉफी न दिल्यास त्याला गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.  सोबतच भारताने मेल केला असला तरी नक्वी ट्रॉफी परत करणार का? नक्वी यांनी ट्रॉफी परत न केल्यास भारतापुढे काय पर्याय आहेत? असे विचारले जात आहे.

भारताने नेमके काय केले आहे?

मिळालेल्या ताज्या माहितीनुसार बीसीसीआयने आशियाई क्रिकेट परिषदेचे प्रमुख मोहसीन नक्वी यांना अधिकृतपणे एक मेल लिहिला आहे. या मेलमध्ये आशिया चषक भारताला सोपवण्यात करावा, असे नक्वी यांना सांगण्यात आले आहे. सोबतच भारताला ही ट्रॉफी न दिल्यास आगामी महिन्यात हे प्रकरण थेट आयसीसीपर्यंत पोहोचू शकते, असा इशाराही बीसीसीआयने नक्वी यांना दिला आहे. त्यामुळे आता नक्वी नेमकं काय करणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

ट्रॉफी अधिकृतपणे सूर्यकुमार यादव आणि संघाला…

आशिया चषकाच्या जेतेपदाची ट्रॉफी भारतात आणण्यासाठी बीसीसीआयकडून प्रयत्न केले जात आहेत. 30 सप्टेंबर रोजी एसीसीची एक बैठक झाली होती. या बैठकीत बीसीसीआयने नक्वी यांच्या कृत्याबाबत आक्षेप नोंदवण्यात आला होता. या बैठकीत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आशिया कप 2025 ची ट्रॉफी ही भारताची आहे, असे सांगितले होते. ही ट्रॉफी अधिकृतपणे भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याला सोपवण्यात यावी. सोबतच सध्या ही ट्रॉफी तत्काळ आशिआई क्रिकेट परिषदेकडे सोपवली जावी, असे मत राजीव शुक्ला म्हणाले होते.

ट्रॉफी आणि मेडल सोबत घेऊन जाण्याचा अधिकार मिळत नाही

याआधी बीसीसीआचे सचीव देवजित सैकिया यांनीदेखील नक्वी यांच्यावर सडकून टीका केली होती. भारतीय संघाने नक्वी यांच्याकडून ट्रॉफी न घेण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे नक्वी यांना ट्रॉफी आणि मेडल सोबत घेऊन जाण्याचा अधिकार मिळत नाही. नक्वी यांचे कृत्य दुर्दैवी आणि खेळ भावनेच्या विरोधात आहे. त्यांनी ट्रॉफी आणि पदकं भारताला लवकरात लवकर दिले पाहिजेत, असे त्यावेळी सैकिया म्हणाले होते.

भारतापुढे नेमका पर्याय काय?

दरम्यान, भारताने नक्वी यांना एक मेल केला आहे. या मेलनंतरही नक्वी यांनी भारताला ट्रॉफी परत न दिल्यास भारत कठोर भूमिका घेणार आहे. नोव्हेंबर महिन्यात आयसीसीची दुबईत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत बीसीसीआय हा मुद्दा उपस्थित करणार आहे. सोबतच नक्वी यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही भारताकडून केली जाऊ शकते. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.