Mohsin Naqvi : ट्रॉफीमुळे मोहसीन नक्वी थेट तुरुंगात जाणार? UAE च्या कठोर कायद्यानुसार किती शिक्षा मिळणार?
एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी हे आशिया चषक सोबत घेऊन गेलेले आहेत. भारताला मिळणार ट्रॉफी त्यांनी सोबत नेलेली आहे. यावरून आता बीसीसीआयने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मोहसीन यांना थेट तुरुंगातही जावे लागण्याची शक्यता आहे.

Asia Cup Trophy : आशिया चषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानला पाच गडी राखून पराभूत केलेले असले तरी भारताला अद्याप हक्काची ट्रॉफी मिळालेली नाही. एसीसीचे प्रमुख मोहसीन नक्वी यांच्याकडून भारताने ट्रॉफी घेण्यास नकार दिल्यानंतर नक्वी ती ट्रॉफी घेऊन गेले होते. ट्रॉफी मीच देणार अशी हेकेखोरपणाची भूमिका त्यांनी घेतली होती. आता त्यांनी माफी मागितली असून ते भारताला ट्रॉफी देण्यास तयार असल्याच बोलले जात आहे. दरम्यान, नक्वी भारताला ट्रॉफी देण्यास तयार असले तरी बीसीसीय मात्र आता माघार घेण्याच्या तयारीत नाही. मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआय आता नक्वी यांच्याविरोधात थेट पोलिसांत तक्रार करण्याची शक्यता आहे.
72 तासांच्या आत ट्रॉफी दिली नाही तर…
मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआय मोहसीन नक्वी यांच्याविरोधात थेट तक्रार करण्याची शक्यता आहे. ट्रॉफीची चोरी तसेच बेकायदेशीरपणे ट्रॉफी ताब्यात घेण्याच्या आरोपांखाली बीसीसीआय नक्वी यांच्याविरोधात तक्रार करण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे नक्वी यांना बीसीसीआयने 72 तासांचा वेळ दिला आहे. 72 तासांच्या आत ट्रॉफी परत दिली नाही, तर आम्ही कारवाई करू, असे बीसीसीआयने म्हटले आहे.
मोहसीन नक्वी यांना काय शिक्षा होऊ शकते?
बीसीसीआय नक्वी यांची सर्वच मार्गांनी कोंडी करण्याची शक्यता आहे. नक्वी यांना पाकिस्तानात जाण्यापासून रोखावे यासाठी बीसीसीआय यूएईच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. विशेष म्हणजे नक्वी यांना एसीसीच्या पदावरून हटवण्याचाही बीसीसीआयकडून प्रयत्न केला जात आहे. दुबईमध्ये मोहसीन नक्वी यांच्याविरोधात चोरीची तक्रार दाखल झाली, तर त्यांना मोठी शिक्षा होऊ शकते. त्यांना पाच ते सात वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागू शकतो. गंभीर चोरीच्या प्रकरणात चोरीची ही शिक्षा 17 वर्षांपर्यंत वाढू शकते.
नक्वी यांनी मागितली माफी पण…
दरम्यान, नक्वी यांनी ट्रॉफी परत देण्याची तयारी दाखवल्याचे बोलले जात आहे. सोबतच त्यांनी माफीही मागितल्याचे म्हटले जातेय. मात्र त्यांनी ट्रॉफी देण्यास नकार दिल्यास आणि बीसीसीआयने नक्वी यांच्याविरोधात तक्रार केल्यास पुढे काय होणार? बीसीसीआय कठोर भूमिका घेणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
