खेळाडूंच्या बायकाही परदेश दौऱ्यावर सोबतच, बीसीसीआयची डोकेदुखी वाढली

खेळाडूंच्या बायकाही परदेश दौऱ्यावर सोबतच, बीसीसीआयची डोकेदुखी वाढली

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघ जेव्हा परदेश दौऱ्यावर जातो, तेव्हा त्यांना पत्नींनाही सोबत ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण यामुळे बीसीसीआयची डोकेदुखी मात्र वाढल्याचं बोललं जातंय. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर बीसीसीआयला या वाईट अनुभवाला सामोरं जावं लागलंय. खेळाडूंच्या पत्नींना त्यांच्यासोबत परदेशात दोन आठवड्यांपर्यंत राहण्याची परवानगी आहे.

काही वृत्तांनुसार, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सर्व व्यवस्थापन करण्यासाठी बीसीसीआयची तारांबळ झाली. सर्व खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि कुटुंबातील सदस्यांची ने-आण करताना बीसीसीआयची डोकेदुखी झाल्याची माहिती आहे. यावेळी एकूण 40 जणांची ने-आण करण्याची व्यवस्था करायची होती. बीसीसीआयने दोन बस बूक केल्या, पण तरीही अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं.

पत्नी किंवा कुटुंबीयांना सोबत ठेवणं हे बीसीसीआयसाठी महागडं ठरत नाही. कारण, खेळाडू पत्नी आणि कुटुंबीयांचा खर्च स्वतःच करतात. पण ने-आण करणं आणि सर्व सामान सांभाळणं यामध्ये बीसीसीआयची डोकेदुखी वाढते.

बीसीसीआयमधील एका अधिकाऱ्याने काही वृत्तांमध्ये म्हटल्याप्रमाणे, “संघासोबत कमी खेळाडू असतील तर व्यवस्थापन सोपं जातं. पण जे नियमित खेळाडू नाहीत, त्यांचे कुटुंबीयही दोन दोन आठवडे परदेश दौऱ्यावर सोबत असतात. बोर्ड स्टाफसाठी मैदानाबाहेर अरेंजमेंट करणं सोपं असतं. तिकीट बूक करण्यापासून ते रुम बूक करण्यापर्यंत सगळं बीसीसीआयलाच करावं लागतं. त्यामुळे इंग्लंडमध्ये विश्वचषकासाठी खेळाडू आणि त्यांचे कुटुंबीय सोबत असतील हे सगळं अवघड असेल. कारण, या सगळ्यांच्या सामानाची ने-आण आणि वाहतुकीची व्यवस्था करावी लागेल.”

काही खेळाडू असे आहेत, जे कसोटी, वन डे आणि टी-20 या तीन फॉरमॅटमध्ये खेळतात. या नियमित खेळाडूंसाठी व्यवस्था करणं बीसीसीआयसाठी कठीण काम नाही. पण जे अनियमित म्हणजेच एका फॉरमॅटसाठी निवडलेले खेळाडू आहेत, त्यांच्या कुटुंबीयांची व्यवस्था करणं बीसीसीआयसाठी डोकेदुखी ठरत असल्याचं बोललं जातंय.

सर्वांना सोबत सांभाळणं, शिवाय सर्वांसाठी एकत्रितपणे सामन्यांची तिकिटे बूक करणं हे अवघड काम असतं. इथे प्रश्न पैशांचा येत नाही. कारण, पैसे तर खेळाडू स्वतः खर्च करतात. पण व्यवस्थापन करणं ही अवघड असल्याचं म्हटलं जातंय. ज्यामुळे बीसीसीआयला अडचणींचा सामना करावा लागतोय.

Published On - 5:35 pm, Fri, 1 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI