वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेच्या पात्रता फेरीसाठी स्पर्धा अधिक तीव्र, या संघाची एन्ट्री जवळपास निश्चित
वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेला आता फक्त एका वर्षाचा अवधी आहे. असं असताना या स्पर्धेत पात्र ठरण्यासाठी संघांमध्ये जोरदार रस्सीखेंच आहे. आयसीसी पात्रता फेरीच्या लढतीत नेदरलँडने नेपाळला नमवून आपला दावा आणखी मजबूत केला आहे.

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेची जोरदार तयारी सुरू झाली आहे. या स्पर्धेसाठी नवा फॉर्मेटही जाहीर करण्यात आला आहे. आता या स्पर्धेतील पात्रता फेरीत जागा मिळवण्यासाठी जोरदार चुरस सुरू आहे. या फेरीत जागा मिळवण्यासाठी आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्डकप लीग 2 स्पर्धा खेळली जात आहे. या स्पर्धेतील एका सामन्यात नेदरलँडने नेपाळला मात दिली. नेदरलँडने नेपाळला 6 विकेट राखून पराभूत केलं. यासह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. जर काही उलथापालथ झाली नाही तर नेदरलँडचं वनडे वर्ल्डकप पात्रता स्पर्धेतील स्थान पक्कं मानलं जात आहे. यासाठी काही सामन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. या लीग स्पर्धेतील टॉप चार संघाना वनडे वर्ल्डकप पात्रता फेरीत एन्ट्री मिळणार आहे. आता नेदरलँडचा पुढचा सामना नामीबियाशी होणार आहे. त्यानंतर नेपाळ आणि नामीबिया यांच्यात लढत होणार आहे. दरम्यान, यजमान देश नामीबियाची स्थिती नाजूक आहे.
पात्रता फेरीत जागा मिळवण्यासाठी धडपड
आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्डकप लीग 2 स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी आहे. सर्व संघांना 36 सामने खेळण्याची संधी मिळते. ही लीग संपल्यानंतर टॉपला असलेल्या 4 संघांना थेट वर्ल्डकप पात्रता फेरीत खेळण्याची संधी मिळेल. तर पाचव्या ते आठव्या स्थानावर असलेल्या संघांना वर्ल्डकप पात्रता फेरीत जागा मिळवण्यासाठी प्लेऑफ खेळावं लागणार आहे. म्हणजेच नेदरलँडने उर्वरित सामन्यात चांगली कामगिरी केली तर टॉप 4 मधील स्थान पक्कं होईल. त्यामुळे प्लेऑफचे सामने न खेळताच पात्रता फेरीत जागा मिळेल.
पात्रता फेरीत कसे होतील सामने
वर्ल्डकप मुख्य पात्रता फेरीसाठी एकूण 10 संघ येतात. लीग 2 मधून 4 संघ, प्लेऑफमधून 2 आणि आयसीसी सुपर लीग/रँकिंगमधून उर्वरित चार संघ येतात. पात्रता फेरीतील सामने संपल्यानंतर4 अंतिम सर्वोत्तम संघ उरतील, त्यांना थेट मुख्य वर्ल्डकप 2027 साठी पात्र ठरवले जाते. मुख्य वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वी पात्र ठरलेल्या सर्व 14 संघांची त्यांच्या आयसीसी वनडे रँकिंगनुसार 1 ते 14 अशी क्रमवारी लावली जाईल. पात्र ठरलेल्या 14 संघांपैकी सर्वात कमी रँकिंग असलेले शेवटचे तीन संघ यात एकमेकांविरुद्ध सुपर सिरीज खेळतील. यातील एक 1 पुढे जाईल आणि दोन बाद होतील.
ग्रुप स्टेजमध्ये मुख्य 12 संघ उरतील आणि प्रत्येकी 6 संघांच्या 2 ग्रुपमध्ये विभागणी केली जाईल. दोन्ही ग्रुपमधील दोन्ही ग्रुपमधील अव्वल तीन संघ आणि दोन्ही ग्रुप मिळून सातवा सर्वोत्तम संघ पुढील फेरीत पोहोचेल. सुपर 7 फेरीतील टॉप 4 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.
