टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमधून अभिषेक नायरला डच्चू, या फ्रेंचायझीने लगेच साधला डाव

टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायरला बीसीसीआयने बाहेरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र याबाबत अधिकृत असं काहीच सांगण्यात आलेलं नाही. असं असताना अभिषेक नायर आयपीएलमधील एका संघासोबत जोडला गेला आहे. फ्रेंचायझीने याबाबतची घोषणा केली आहे.

टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमधून अभिषेक नायरला डच्चू, या फ्रेंचायझीने लगेच साधला डाव
अभिषेक नायर
Image Credit source: PTI
| Updated on: Apr 19, 2025 | 6:42 PM

बीसीसीआयने गौतम गंभीरच्या कोचिंग स्टाफला कात्री लावली आहे. यात तीन दिग्गजांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यात टीम इंडियाचा सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायरचाही समावेश होता. पण बीसीसीआयने याबाबत अधिकृत असं काहीच सांगितलेलं नाही. पण अभिषेक नायरने लगेच नवा संघ निवडला आहे. आयपीएल 2025 स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघासोबत जोडला गेला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने याबाबतची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. तसं पाहायला गेलं तर अभिषेक नायरची कोलकाता नाईट रायडर्स फ्रेंचायझीमध्ये घरवापसी झाली आहे. केकेआर फ्रेंचायझीने सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिषेक नायर कोचिंग स्टाफमध्ये सहभागी झाल्याचं सांगितलं आहे. टीम इंडियासोबत जाण्यापूर्वी अभिषेक नायर आयपीएल 2024 पर्वात कोलकाता फ्रेंचायझीचा भाग होता. जेव्हा केकेआरने तिसरा आयपीएल किताब जिंकला होता.

गतविजेचा कोलकाता नाईट रायडर्स संघात अभिषेक नायर यांची काय भूमिका असेल हे अद्याप अस्पष्ट आहे. पण कोलकाता संघात नायरचा खूपच सन्मान केला जातो. तसेच ड्रेसिंग रुममध्ये सन्मान केला जातो. या पर्वात केकेआरचा कर्णधार बदलला आहे. पण चंद्रकांत पाटील आणि अजिंक्य रहाणे नायर यांचं स्वागत करतील यात काही शंका नाही. कोलकात्याने आतापर्यंत 7 सामने खेळले असून त्यापैकी 3 सामन्यात विजय आणि 4 सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. आता टीमचा पुढचा सामना गुजरात टायटन्सशी 21 एप्रिलला होणार आहे. यावेळी नायर डगआऊटमध्ये दिसतील यात काही शंका नाही.

बीसीसीआयने कोचिंग स्टाफमध्ये केलेल्या बदलाबाबत अद्याप काही स्पष्ट केलेलं नाही. पण भारताची कसोटी खराब कामगिरी यासाठी कारणीभूत असू शकते. भारताने 2024 मध्ये न्यूझीलंडविरुद्धची मालिका 0-3 गमावली होती. तर बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतही ऑस्ट्रेलियाने 1-3 ने पराभूत केलं होतं. नायर यांचा कार्यकाळ जूनमध्ये संपणार होता. पण इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापू्र्वी आणि संघाच्या निवडीपूर्वी बदल करण्याचा निर्णय घेतला. बीसीसीआयने सपोर्ट स्टाफमधून फिल्डिंग कोच टी दिलीप आणि कंडिशनिंग कोच सोहम देसाई यांनाही दूर केलं आहे.