Afghanistan: टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाला अफगाणिस्तानकडून मोठी जबाबदारी
Afghanistan Cricket Board: अफगाणिस्तान क्रिकेट टीम येत्या काही दिवसांनी न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिके विरुद्ध अनुक्रमे कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्याआधी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे.

अफगाणिस्तान क्रिकेट टीमने राशिद खान याच्या नेतृत्वात आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत सेमी फायनलपर्यंत धडक मारली होती. आता अफगाणिस्तान न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिके विरुद्ध भिडणार आहे. त्याआधी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाचे माजी फिल्डिंग कोच रामकृष्णन श्रीधर यांची अफगाणिस्तान क्रिकेट टीमच्या सहाय्यक कोचपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने याबाबतची माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे. अफगाणिस्तान भारत दौऱ्यात नोएडात न्यूझीलंड विरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. तर दक्षिण आफ्रिके विरुद्ध 3 मॅचची वनडे सीरिज खेळणार आहे. आर श्रीधर या दोन्ही मालिकेत सहाय्यक प्रशिक्षकाच्या भूमिकेत असणार आहेत. आर श्रीधर हे टीम इंडियाचे जवळपास 7 वर्ष फिल्डिंग कोच राहिले आहेत.
आर श्रीधर यांची कामगिरी
आर श्रीधर यांनी आपल्या क्रिकेट कारकीर्दीत 35 फर्स्ट क्लास आणि 15 लिस्ट ए सामने खेळले आहेत. तसेच आर श्रीधर 2 वनडे आणि 2 टी20i वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाचे फिल्डिंग कोच राहिले आहेत. श्रीधर टीम इंडियासोबत जवळपास 7 वर्ष राहिले. राहुल द्रविड हेड कोच झाल्यानंतर आर श्रीधर यांची जागा हीटी दुलीप यांनी घेतली. आर श्रीधर आयपीएलमध्ये 2014-2017 या दरम्यान पंजाब किंग्स टीममध्ये बॉलिंग कोच म्हणून जबाबदारी पार पाडली. आर श्रीधर लेव्हल 3 प्रमाणित प्रशिक्षक आहेत. श्रीधर अंडर 19 टीम इंडियासह देखील होते. आर श्रीधर यांनी 2008-2014 दरम्यान एनसीएत सहाय्यक फिल्डिंग आणि स्पिन बॉलिंग कोच म्हणून सेवा दिली आहे.
आर श्रीधर यांची अफगाणिस्तानच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी नियुक्ती
ACB name R. Sridhar as National Team’s Asst. Coach for New Zealand and South Africa Fixtures.
More: https://t.co/B8VZlnB10t pic.twitter.com/nmCuVpCqD9
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) August 21, 2024
अफगाणिस्तानची कामगिरी
दरम्यान अफगाणिस्तान टीमने गेल्या काही वर्षात क्रिकेट विश्वात आपला ठसा उमटवला आहे. अफगाणिस्तानने नुकत्याच झालेल्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. अफगाणिस्तानने न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवला. त्यामुळे आगामी मालिकांमध्येही क्रिकेट चाहत्यांना अफगाणिस्तानकडून अशाच कामगिरीची आशा असणार आहे.
