IND vs NZ: दुखापतीतून परतला, मैदान गाजवलं अन् शतकवीराला जाळ्यात अडकवलं! आकाश दीपने सांगितला ग्लेन फिलिप्सला बाद करण्याचा मास्टरप्लॅन
Akash Deep Breaks Silence on Glenn Phillips Wicket: भारतीय वेगवान गोलंदाज आकाश दीपने दुखापतीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये केलेल्या प्रभावी पुनरागमनाचे श्रेय मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना दिले आहे.

आकाश दीपने शतक झळकावलेल्या ग्लेन फिलिप्सला कसे बाद करायचे याचे नियोजन कसे केले, हे सांगितले. ही विकेट यासाठीही खास होती, कारण त्यामुळे भारतीय गोलंदाजांवर दबाव आणणारी भागीदारी तुटली. फिलिप्सने हेन्री निकोल्ससोबत सहाव्या विकेटसाठी 216 धावांची भागीदारी केली होती. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आकाशने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दलही सांगितले.
न्यूझीलंडने 70 धावांत पाच गडी गमावले होते. ग्लेन फिलिप्सने हेन्री निकोल्ससोबत 216 धावांची भागीदारी करून आपल्या संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. आकाश दीपने टाकलेल्या एका अप्रतिम चेंडूवर फिलिप्स त्रिफळाचीत झाला. या खेळपट्टीबद्दल तो म्हणाला, चेंडूला अधिक वळण देण्यासाठी मी जास्त जोर लावला. फलंदाजाला सामन्यात टिकवून ठेवण्यासाठी आणि त्याच्या मनाशी खेळण्यासाठी मी क्रीजच्या खूप बाहेरून गोलंदाजी केली.
आकाश पुढे म्हणाला की, एक वेगवान गोलंदाज म्हणून पाठीला दुखापत होऊन पुनरागमन करणे खूप कठीण असते. माझ्यासाठी एक चांगली गोष्ट ही होती की आमचे प्रशिक्षक गौतम गंभीर सर त्यावेळीसुद्धा माझ्याकडून माहिती घेत होते. तुझे तयारी कशी चालली आहे, काय होत आहे आणि अधिक मजबूत होऊन परत ये, असे विचारत होते. त्यामुळे ही माझ्यासाठी एक चांगली गोष्ट होती. दुखापतीच्या काळात मी माझ्या खेळावर काम केले. मी जवळपास दीड वर्षानंतर खेळत आहे, पण इतक्या मोठ्या कालावधीनंतर खेळत आहे असे अजिबात वाटले नाही.
आकाश दीपने न्यूझीलंडविरुद्ध 53 धावांत तीन बळी घेत आपले पुनरागमन संस्मरणीय केले. त्याच्या गोलंदाजीतील एक विशेष क्षण म्हणजे ग्लेन फिलिप्सची विकेट. या वेगवान गोलंदाजाने बेसिन रिझर्व्ह येथील बदलत्या परिस्थितीबद्दलही सांगितले, जिथे पहिल्या दिवशी दुपारच्या जेवणानंतर खेळपट्टी संथ झाली, पण दुसऱ्या दिवशी नवीन चेंडूने थोडी मदत केली. तो म्हणाला, पहिल्या दिवशी दुपारच्या जेवणानंतर खेळपट्टी संथ झाली होती. आज नवीन चेंडूने थोडी मदत केली.
आकाशने म्हणाला की, धावा रोखणे आणि योजनेला चिकटून राहणे महत्त्वाचे आहे, विशेषतः जुन्या चेंडूने गोलंदाजी करताना. जुन्या चेंडूने गोलंदाजी करताना, पहिला पर्याय धावा रोखणे हा असतो आणि मग योजनेला चिकटून राहणे. माझा येथील अनुभव असा आहे की, तुम्हाला योजनेनुसार गोलंदाजी करावी लागते आणि धावा रोखाव्या लागतात. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने एक गडी गमावून 159 धावा केल्या होत्या. यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी भारताला भक्कम सुरुवात करून दिली.
जयस्वालने 16 चौकारांच्या मदतीने 89 चेंडूंमध्ये 85 धावा केल्या, पण त्याचे शतक हुकले. केएल राहुल 52 धावांवर नाबाद असून त्याच्यासोबत देवदत्त पडिक्कल आहे, जे तिसऱ्या दिवशी 159/1 या धावसंख्येवरून भारताचा डाव पुढे चालू ठेवतील. पहिल्या डावात भारतासाठी जसप्रीत बुमराहने सर्वाधिक चार बळी घेतले. आकाश दीपने तीन, तर अंशुल कंबोजने दोन बळी घेतले. प्रसिद्ध कृष्णाने एक बळी घेतला. वॉशिंग्टन सुंदरला एकही बळी मिळाला नाही.