Nitish Bharadwaj : रावणाला नायक दाखवलं, एक अजेंडा…प्रसिद्ध अभिनेत्याचा ‘रामायण’ सिनेमावर घणाघात
Ramayana Movie : नितीश भारद्वाज यांनी रणबीर कपूरच्या 'रामायण' सिनेमावर संताप व्यक्त केला आहे.

रणबीर कपूरच्या ‘रामायण’ चित्रपटानं चित्रपटगृहांमध्ये अवघ्या 15 दिवसांत 1500 कोटींहून अधिक कमाई केली आहे. चित्रपटाला चाहत्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला, पण अनेकांनी त्यावर उघडपणे टीकाही केली. रामानंद सागर यांच्या ‘रामायण’मध्ये लक्ष्मणाची भूमिका साकारणाऱ्या सुनील लाहिरी यांनी चित्रपटातील भावनांच्या अभावाबद्दल खंत व्यक्त केली. त्यांनी चित्रपटातील काही गाणी कमकुवत असल्याचीही टीका केली. बी.आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या टीव्ही मालिकेत कृष्णाची भूमिका साकारणाऱ्या नितीश भारद्वाज यांनी आता चित्रपटावर भाष्य केलं आहे. नितीश भारद्वाज यांनी चित्रपटगृहात ‘रामायण’ पाहिला आणि आपलं प्रामाणिक मत मांडलं. त्यांनी सिनेमातील काही सीन्स भावनिकदृष्ट्या कमकुवत असल्याचं सांगत, या चित्रपटाला स्पष्टपणे एक विशिष्ट अजेंडा असलेला चित्रपट म्हटलं आहे.
एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत ज्येष्ठ अभिनेते नितीश भारद्वाज ‘रामायण’ चित्रपटाबद्दल बोलताना म्हणाले की, ‘प्रभू रामाच्या पात्राला केवळ एक भावशून्य चेहरा आणि एक सामान्य दिसणारा माणूस म्हणून दाखवण्यात आलं आहे. राम असे नव्हते. त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हटलं जायचं.’ नितीश भारद्वाज यांनी असंही म्हटलं आहे की, राम अयोध्या सोडून जात असलेल्या दृश्यात कोणतीही भावना दिसत नाही. सूर्यवंशी वंशातील प्रजा पूर्णपणे भावनाशून्य दाखवण्यात आली आहे.
रावणाला नायक म्हणून चित्रित केलं आहे
नितीश भारद्वाज यांनी रामायण चित्रपटाचं स्पष्ट आणि अचूक परीक्षण केलं आहे. चित्रपटात प्रभू रामाला नव्हे, तर रावणाला नायक म्हणून चित्रित केलं आहे. चित्रपटात रावणाचे नकारात्मक पैलू वगळण्यात आले आहेत. तसंच चित्रपटासाठी 4 हजार कोटींचा निधी लागला हे सांगितलं जातं आहे. निर्मात्यांना लक्झमबर्ग, UAE आणि सिंगापूरमधून चित्रपटासाठी पैसे आले आहेत. या देशांना भारताचं चांगलं काही असेल ते बघवत नाही, त्यामुळे एक विशेष अजेंडा राबवून हा चित्रपट तयार करण्यात आला आहे, असा गंभीर आरोपही नितीश भारद्वाज यांनी केला. नितीश यांनी रावणाच्या पात्राची तुलना मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्याशी केली. चित्रपटात खलनायकाला नायक आणि नायकाला खलनायक बनवलं आहे. ज्यांनी रामायण वाचलेलं नाही आणि फक्त पाहिलं आहे, ते पुढील दोन वर्षे रावणाला एक ‘कूल’ व्यक्ती मानत राहतील आणि हे चुकीचं आहे, असंही नितीश म्हणाले.
रामायण चित्रपटाबाबत बोलायचं झाल्यास, चित्रपटाला मोठा धक्का बसला आहे. सिनेमाची कमाई घसरली आहे. गेल्या दोन दिवसांत ‘रामायण’नं चांगली कमाई केलेली नाही आणि 15 व्या दिवशी चित्रपटानं 20 कोटींपेक्षा कमी कमाई केली आहे. मात्र, प्रदर्शनाच्या पहिल्या 15 दिवसांत चित्रपटानं जगभरात 1500 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. हा चित्रपट 2000 कोटींची कमाई करेल अशी अपेक्षा आहे.
