Asia Cup 2023: ऋषभ पंत याच्या फिटनेसपासून धवन याच्या निवडीबाबत समितीत काय चर्चा झाली? रोहित-आगरकर काय म्हणाले? वाचा
Team India : आशिया कप 2023 स्पर्धेसाठी टीम इंडियाची निवड झाली आहे. अपेक्षेप्रमाणे काही खेळाडूंचं संघात पुनरागमन झालं आहे. इतकंच काय वनडे वर्ल्डकपच्या दृष्टीने या संघाची बांधणी केल्याचं बोललं जात आहे. रोहित शर्मा आणि अजित आगरकर यांनी याबाबत काय सांगितलं ते वाचा

मुंबई : आशिया कप 2023 स्पर्धेसाठी टीम इंडियाच्या 17 खेळाडूंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. एक दोन खेळाडू सोडता इतर खेळाडूंची निवड अपेक्षेप्रमाणे झाली आहे. श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांचं संघात पुनरागमन झालं आहे. असं असताना केएल राहुल फिट आहे की नाही याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. पण त्यांची दुखापत गंभीर नसून आशिया कप स्पर्धेच्या सुरुवातीला फीट होईल असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे संघाच्या निवडीबाबत चर्चांना उधाण आलं आहे. हाच संघ वनडे वर्ल्डकपसाठी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे, कर्णधार रोहित शर्मा याने इतर खेळाडूंना वनडे वर्ल्डकपसाठी दारं खुली असल्याचं सांगितलं आहे. टीम इंडियाची निवड होताच कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी दिलखुलासपणे उत्तरं दिली.
पत्रकार परिषदेत रोहित-आगरकर नेमके काय म्हणाले ते वाचा..
- आयपीएल दरम्यान दुखापतग्रस्त झालेला केएल राहुल हॅमस्ट्रिंग इंजरीतून बरा झाला आहे. पण त्याला एक वेगळी दुखापत असल्याचंही अजित आगरकर याने सांगितलं आहे. पण ही दुखापत गंभीर नसून स्पर्धेपूर्वी फिट होईल. पण नेमकी दुखापत कसली आहे हे मात्र सांगितलं नाही. यासाठी संजू सॅमसन याला बॅकअप म्हणून ठेवलं आहे.
- आशिया कपसाठी निवडलेल्या संघातूनच वर्ल्डकपसाठी खेळाडूंची निवड होईल. पण अजित आगरकर याने हा संघ फक्त आशिया कपसाठीच असल्याचं सांगितलं आहे. वर्ल्डकप संघ निवडण्यासाठी 5 सप्टेंबरपर्यंतचा अवधी आहे.
- कर्णधार रोहित शर्मा याने सांगितलं की निवड झालेल्या खेळाडूंना कोणत्याही पोझिशनवर खेळण्यास तयार राहणं गरजेचं आहे. खासकरून मधल्या फळीच्या फलंदाजाना बॅटिंगसाठी वर किंवा खाली जाण्याची तयारी ठेवावी लागेल.
- रोहित शर्मा याने सांगितलं की, वेगवान गोलंदाजांच्या बाबतीत कोणतीही तडजोड शक्य नाही. त्यामुळे युजवेंद्र चहला याला टीम इंडियात जागा मिळणं कठीण होतं. संघाला आठव्या स्थानासाठी बॅटिंग करणारा खेळाडू हवा आहे. यासाठी अष्टपैलू अक्षर पटेलची निवड केली आहे. गरज पडल्यास तो फलंदाजी करू शकतो. असं असलं तरी वर्ल्डकपचे दरवाजे अजूनही खुले आहेत.
🗣️ "It's about the entire batting unit coming together and getting the job done."#TeamIndia captain @ImRo45#AsiaCup2023 pic.twitter.com/qZRv4za7k4
— BCCI (@BCCI) August 21, 2023
- मुख्य निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर याने सांगितलं की, दोन रिस्ट स्पिनर संघात निवड करणं कठीण होतं. त्यामुळे त्याची संघात निवड झाली नाही. पण वनडे वर्ल्डकपचे दरवाजे अजूनही खुले आहेत.
- ऋषभ पंत याच्या निवडीबाबत कर्णधार रोहित शर्मा याला प्रश्न विचारण्यात आला. पण यावर त्याने मोकळेपणाने उत्तर दिलं नाही. रोहित शर्मा म्हणाला की, ऋषभ पंत आशिया कप खेळेल इतका फिट नाही.
- माजी क्रिकेटपटूंनी वर्ल्डकपच्या दृष्टीने हा संघ बेस्ट असल्याचं सांगितलं आहे पण रोहित शर्माचं मत वेगळं आहे. रोहित शर्मा याने सांगितलं की, टीम फेव्हरेट नसते जो त्या दिवशी चांगला खेळेल तेव्हाच विजय मिळतो, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. टीम इंडियाला देशात खेळण्याचा फायदा होईल. विदेशी खेळाडूंनाही भारतातील परिस्थितीचा चांगला अनुभव आला आहे.
- शिखर धवन याच्याबाबत अजित आगरकर याला प्रश्न विचारताच त्याने सांगितलं की, तो चांगला ओपनर आहे. पण संघात स्थान मिळणं कठीण होतं. कारण ओपनर म्हणून रोहित, इशान आणि शुभमन गिल चांगले खेळत आहेत. त्यामुळे त्याला स्थान मिळणं कठीण आहे.
