IND vs PAK : कुलदीपची कमाल, पाकिस्तान बेहाल! टीम इंडियासमोर फायनलमध्ये 147 धावांचं आव्हान, पाकिस्तान रोखणार?
Asia Cup 2025 India vs Pakistan Final 1st Innings Highlights : टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजांनी पाकिस्तानचं कंबरडं मोडलं. त्यामुळे पाकिस्तानला चांगल्या सुरुवातीनंतरही 150 पार पोहचता आलं नाही.

टीम इंडियाने फिरकी गोलंदाजांनी केलेल्या चाबूक कामगिरीच्या जोरावर आशिया कप 2025 स्पर्धेतील अंतिम सामन्यात पाकिस्तानला गुंडाळलं आहे. पाकिस्तानला भारतीय गोलंदाजांसमोर पूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. पाकिस्तानला गुंडाळण्यात कुलदीप यादव याने प्रमुख भूमिका बजावली. कुलदीपने सर्वाधिक 4 विकेट्स घेऊन पाकिस्तानच्या फलंदाजीचं कंबरडं मोडलं. तर इतरांनी चांगली साथ दिली. त्यामुळे टीम इंडियाला पाकिस्तानला 19.1 ओव्हरमध्ये सहज ऑलआऊट करता आलं. त्यामुळे आता टीम इंडियाला आशिया चॅम्पियन होण्यासाठी फक्त 147 धावांची गरज आहे. आता टीम इंडिया हे आव्हान किती ओव्हरमध्ये पूर्ण करणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
पाकिस्तानची कडक सुरुवात आणि घसरगुंडी
कॅप्टन सूर्यकुमार यादव याने टॉस जिंकून पाकिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडलं. पाकिस्तानच्या सलामी जोडीने याचा चांगलाच फायदा घेतला. साहिबजादा फरहान आणि फखर झमान या सलामी जोडीने पाकिस्तानसाठी अर्धशतकी भागीदारी केली. त्यामुळे टीम इंडिया सामन्यात बॅकफुटवर गेली होती. मात्र वरुण चक्रवर्ती याने दहाव्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर पाकिस्तानला पहिला झटका देत ही सेट जोडी फोडली.या जोडीने 84 धावा जोडल्या. वरुणने साहिबजादाला तिलक वर्मा याच्या हाती कॅच आऊट केलं. साहिबजादाने पाकिस्तानसाठी सर्वाधिक 57 धावा केल्या.
त्यानंतर सॅम अयुब आणि फखर या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 29 रन्स जोडल्या. टीम इंडियाने पाकिस्तानला 113 धावांवर दुसरा झटका दिला. कुलदीपने सॅम अयुब याला 14 रन्सवर आऊट करत आपली पहिली विकेट घेतली. त्यामुळे टीम इंडियावरचा दबाव काहीसा कमी झाला. मात्र इथूनच सामन्यात ट्विस्ट आला. सामन्यात बॅकफुटवर असलेल्या टीम इंडियाने अचानक गेम बदलला. भारताच्या फिरकी गोलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांना झटपट गुंडाळलं मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे पाकिस्तानचा डाव पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला.
अक्षर पटेल याने मोहम्मद हारीस याला 14 व्या ओव्हरमध्ये झिरोवर आऊट करत आपली पहिली विकेट मिळवली. त्यानंतर वरुण चक्रवर्ती याने सेट फखर जमान याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. वरुणने फखरला 46 रन्सवर कुलदीप यादव याच्या हाती कॅच आऊट केलं. त्यामुळे पाकिस्तानचा स्कोअर 14.4 ओव्हरमध्ये 4 आऊट 126 असा झाला.
त्यानंतर पाकिस्तानच्या 6 पैकी एकाही फलंदाजाला भारतीय गोलंदाजांसमोर दुहेरी आकडा गाठता आला नाही. त्यामुळे पाकिस्तानला चांगल्या सुरुवातीनंतरही 150 पार पोहचता आलं नाही. कुलदीप यादव याने 4 ओव्हरमध्ये 30 धावा देत सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. कुलदीपने या 4 पैकी 3 विकेट्स 17 व्या ओव्हरमध्ये घेतल्या. तसेच जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल या तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. भारताने अशाप्रकारे पाकिस्तानला 19.1 ओव्हरमध्ये 146 रन्सवर रोखलं.
