IND vs PAK: इंडिया-पाकिस्तान यांच्यात फायनलमध्ये सरस कोण? दोघांपैकी हा संघ वरचढ, पाहा आतापर्यंतची आकडेवारी
India vs Pakistan Final Record Stats : आशिया कप गतविजेत्या टीम इंडियासमोर यंदा अंतिम फेरीत पाकिस्तानचं आव्हान असणार आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान महाअंतिम सामन्याचे क्रिकेट चाहत्यांना वेध लागले आहेत. जाणून घ्या या दोन्ही संघांची अंतिम फेरीत एकमेकांविरुद्ध कशी कामगिरी राहिली आहे.

आशिया कप 2025 स्पर्धेतील पाचव्या सामन्यात बांगलादेशला पराभूत करत पाकिस्तानने सुपर 4 फेरीत दुसरा विजय मिळवला. पाकिस्तानने या विजयासह अंतिम फेरीत धडक दिली. यासह अंतिम फेरीतील 2 संघ निश्चित झाले. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात रविवारी 28 सप्टेंबरला महामुकाबला होणार आहे. दोन्ही संघांची आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात फायनलमध्ये आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. टीम इंडियाने याआधी पाकिस्तानला साखळी आणि सुपर 4 फेरीत पराभूत केलं होतं. त्यानंतर आता टीम इंडियाकडे अंतिम फेरीत पाकिस्तानला तिसऱ्यांदा पराभूत करत सलग दुसऱ्यांदा आशिया कप ट्रॉफी उंचावण्याची संधी आहे. तर पाकिस्तानकडे याआधीच्या 2 पराभवांची परतफेड करण्याची संधी आहे. त्यामुळे महाअंतिम सामन्यात या 2 कट्टर प्रतिस्पर्धी संघात जोरदार चुरस असणार आहे.
भारत पाकिस्तान हे दोन्ही संघ 8 वर्षांआधी 2017 साली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील अंतिम सामन्यात भिडले होते. तेव्हा पाकिस्तानने भारतावर मात करत आयसीसी ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर दोन्ही संघात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने आतापर्यंत दोन्ही संघ अंतिम फेरीत केव्हा केव्हा आमनेसामने आले आहेत? हे जाणून घेऊयात.
भारत-पाकिस्तान आणि अंतिम सामना
भारत-पाकिस्तान दोन्ही संघ पहिल्यांदा 1985 साली मोठ्या स्पर्धेतील अंतिम फेरीत आमनेसामने आले होते. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाकिस्तानवर 8 विकेट्सने मात केली होती. त्या स्पर्धेपासून दोन्ही संघ अंतिम फेरीत एकूण 12 वेळा आमनेसामने आले आहेत. या अंतिम फेरीतील 12 सामन्यांमध्ये पाकिस्तान सरस ठरली आहे. पाकिस्तानवर 12 पैकी 8 वेळा अंतिम फेरीत विजय मिळवत मैदान मारलं आहे. तर टीम इंडियाने 4 वेळा पलटवार केला आहे.
पाकिस्तानने अखेरीस अंतिम फेरीत टीम इंडिया विरुद्ध 2017 साली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवला होता. पाकिस्तानने टीम इंडियावर 180 धावांच्या फरकाने मात करत चॅम्पियन्स होण्याचा बहुमान मिळवला होता. तसेच टीम इंडियाने 2007 साली पहिल्याच टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामन्यात 5 धावांनी थरारक विजय साकारला होता.
आशिया कप स्पर्धेच्या इतिहासातील दोन्ही संघांची कामगिरी
दरम्यान आशिया कप स्पर्धेच्या 41 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही संघ आमनेसामने असणार आहेत. आशिया कप स्पर्धेची ही 17 वी वेळ आहे. भारत आशिया कप स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ भारताने 17 पैकी 8 वेळा आशिया कप ट्रॉफी जिंकली आहे. तर पाकिस्तानला केवळ 2 वेळाच आशिया चॅम्पियन्स होता आलं आहे. त्यामुळे आता या दोघांपैकी कोणता संघ आशिया चॅम्पियन होणार? यासाठी 28 सप्टेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
