
India-Pakistan Match 2025 : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान आज आशिया कप 2025 चा सामना होत आहे. पण या सामन्याला भारतातून मोठा विरोध होत आहे. क्रिकेटप्रेमींपासून ते विरोधकापर्यंत सर्वांनी सरकारला पहेलगाम हल्ल्याची आठवण करून देत सामना थांबवण्याचे आवाहन केले होते. पण मोदी सरकारने त्यात हस्तक्षेप केला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. एकीकडे ठाकरे सेना आज माझं कुंकू, माझा देश हे आंदोलन करत आहेत. तर इतर अनेक नेत्यांनी मोदी सरकारव निशाणा साधला आहे. AIMIM चे मुख्य असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपावर तिखट प्रतिक्रिया दिली. पाकिस्तानने पहलगाममध्ये 26 भारतीय नागरिकांचा जीव घेतला. त्यांच्यासोबत क्रिकेट खेळणे कितपत योग्य आहे? असा सवाल त्यांनी केला.
भाजपला पकडले कोंडीत
एका क्रिकेट सामन्यातून होणारी कोट्यवधींची कमाई ही त्या 26 निष्पाप जीवांपेक्षा अधिक आहे का? असा रोखठोक सवाल त्यांनी भाजपला केला. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यात इतकी शक्ती नाही का की ते या सामन्याविरोधात बोलतील, हा सामना होऊ नये अशी मागणी करतील, असा चिमटा ही ओवेसी यांनी काढला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही सवाल
एआयएमआयएमचे प्रमुख ओवेसी यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. रक्त आणि पाणी सोबत वाहू शकत नाही, या वाक्याचा पंतप्रधानांना विसर पडला का असा टोला त्यांनी लगावला. संवाद आणि दहशतवाद सोबत चालू शकत नाही, याची तरी आठवण त्यांना आहे का, असे ओवेसी म्हणाले.
या सामन्यातून 2000-3000 कोटींची कमाई
यावेळी एका क्रिकेट सामन्यातून होणारी कोट्यवधींची कमाई ही त्या 26 निष्पाप जीवापेक्षा अधिक आहे का, असा सवाल करत या सामन्यातून किती कमाई होणार याचा अंदाजच त्यांनी वर्तवला. बीसीसीआय एका सामन्यातून 2000 ते 3000 कोटींची कमाई करणार आहे. ही रक्कम 26 निष्पाप नागरिकांच्या जीवापेक्षा अधिक मौल्यवान आहे का? असा सवाल करत त्यांनी मोदी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
भारत-पाकिस्तान सामना आज होत आहे. त्याविरोधात राजकीय वातावरण तापले आहे. अनेक संघटना आणि पक्षांनी या सामन्याला विरोध केला आहे. तर या सामन्यावर क्रिकेट प्रेमींची पण नाराजी असल्याचे दिसून येत आहे.