
इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिका बरोबरीत सोडवल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिल याला येत्या काही दिवसांतच मोठी जबाबदारी मिळू शकते. शुबमनला आशिया कप 2025 स्पर्धेसाठी भारतीय टी 20i संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. तसेच युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याला बाहेर बसावं लागू शकतं. बीसीसीआय निवड समिती लवकरच बहुप्रतिक्षित आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करु शकते. या दरम्यान टी 20i संघाचा नियमित कर्णधार सूर्यकुमार यादव याच्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
आशिया कप 2025 स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर 19 किंवा 20 ऑगस्टला भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते. तसेच सेंटर ऑफ एक्सीलेंस येथून स्पोर्ट्स सायन्स टीमकडून खेळाडूंचे मेडीकल रिपोर्ट येणार आहेत. त्यानंतर कोणते खेळाडू फिट आहेत आणि कोणते नाहीत? याआधारे आशिया कप स्पर्धेसाठी संघ जाहीर केला जाणार आहे.
पीटीआय रिपोर्ट्सनुसार, सूर्यकुमारच्या फिटनेसकडे सर्वांचं लक्ष आहे. सूर्याने शस्त्रक्रियेनंतर बंगळुरुतील एनसीएत सरावाला सुरुवात केली आहे. सूर्या येत्या काही दिवसात फिटनेस सिद्ध करु न शकल्यास शुबमन गिल याला कर्णधारपदाची जबाबदारी मिळू शकते.
रिपोर्ट्सनुसार, सूर्याच्या नेतृत्वात टी 20i मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रमुख खेळाडूंना संघात कायम ठेवण्यात येणार आहे. निवड समिती यात कोणताही बदल करणार नसल्याचा उल्लेख हा या रिपोर्टमध्ये आहे. भारताच्या प्रमुख खेळाडूंमध्ये अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या आणि तिलक वर्मा यांचा समावेश आहे.
रिपोर्ट्सनुसार, अभिषेक शर्मा आयसीसी टी 20i रँकिगमधील नबंर 1 फलंदाज आहे. तसेच संजू सॅमसन याने बॅट्समन आणि विकेटकीपर म्हणून उल्लेखनीय कामगिरी आहे. शुबमनने आयपीएल आणि इंग्लंड दौऱ्यात चमकदार कामगिरी केली आहे. मात्र त्यानंतरही शुबमनची आशिया कप स्पर्धेसाठी निवड होणं अवघड असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र सूर्या फिटनेसमुळे बाहेर राहिल्यास शुबमनला नेतृत्वाची जबाबदारी मिळू शकते.
तसेच यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शन या दोघांना टी 20i संघात स्थान मिळवण्यासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागू शकते. हे दोघेही इंग्लंड दौऱ्यावर होते. तसेच केएल राहुल यालाही संधीची शक्यता नाही, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
निवड समितीची मुख्य विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन हा पहिली पसंती आहे. तर दुसरा विकेटकीपर म्हणून जितेश शर्मा आणि प्रबळ दावेदार आहे. या एका जागेसाठी ध्रुव जुरेल आणि जितेश शर्मा यांच्यात चुरस आहे. जितेशने आरसीबीला आयपीएल 2025 मध्ये चॅम्पियन करण्यात निर्णायक भूमिका बजावली होती.
भारताचा प्रमुख आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आशिया कप स्पर्धेत खेळण्यासाठी सज्ज आहे.मात्र बुमराहला आगामी मालिकांच्या हिशोबाने आशिया कप स्पर्धेसाठी विश्रांती दिली जाऊ शकते. भारतीय संघ मायदेशात ऑक्टोबर महिन्यात विंडीज विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. त्यामुळे अर्शदीप सिंह याला संधी मिळू शकते. तर प्रसिध कृष्णा आणि हर्षित राणा या दोघांपैकी एकाची निवड केली जाऊ शकते.
आशिया कप स्पर्धेचं आयोजन हे यूएमध्ये करण्यात आलं आहे. यूएईमधील स्थिती पाहता निवड समिती अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर या दोघांना संधी देऊ शकते. तसेच कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती या दोघांपैकी कुणा एकाचा समावेश केला जाऊ शकतो.
आशिया कप 2025 स्पर्धेसाठी भारताचा संभाव्य संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वाशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, हर्षित राणा/प्रसिद्ध कृष्णा, जितेश शर्मा/ध्रुव जुरेल.