
साखळी फेरीनंतर आशिया कप 2025 स्पर्धेतील सुपर 4 राऊंडमध्ये टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. भारताने साखळी फेरीत 14 सप्टेंबरला झालेल्या सामन्यात पाकिस्तानवर एकतर्फी विजय मिळवला होता. त्यानंतर आता टीम इंडिया पुन्हा एकदा पाकिस्तानला पराभूत करण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना रविवारी 21 सप्टेंबरला दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. या सामन्यात टॉस फॅक्टर निर्णायक ठरणार आहे. दुबईत टॉस गमावणाऱ्या संघाच्या अडचणीत वाढ होऊ शकते.
सामन्याचा निकाल कुणाच्या बाजूने लागणार यात खेळपट्टीची भूमिका निर्णायक ठरते. दुबईतील खेळपट्टी संथ आहे. तर अबुधाबीच्या तुलनेत संघांनी दुबईत सन्मानजनक धावसंख्या उभारली आहे. दुबईत फटकेबाजी करण्यासाठी फलंदाजाला स्थिरस्थावर होण्यासाठी काही वेळ घ्यावा लागतो. किमान मधल्या षटकांमध्ये असंच होतं.
दुबईची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी डोकेदुखी ठरली आहे. या स्पर्धेत आतापर्यंत दुबईत 6 पैकी 4 सामन्यांमध्ये विजयी धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाचा विजय झाला आहे. तसेच दुबईत आतापर्यंत भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात एकूण 4 टी 20I सामने झाले आहेत. या चारही सामन्यांत दुसर्या डावात बॅटिंग करणाऱ्या संघाचा विजय झाला आहे.
भारतीय संघाने साखळी फेरीत 14 सप्टेंबरला पाकिस्तानवर मात केली होती. भारताने विजयी धावांचा पाठलाग करताना हा सामना 7 विकेट्सने जिंकला होता. यावरुन सिद्ध होतं की दुबईतील सामन्यात टॉस जिंकणाऱ्या संघाची पहिले फिल्डिंग करण्यास पसंती असते. त्यामुळे टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय योग्य ठरेल, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
दुबई प्रचंड उष्णता असणार आहे. भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान तापमान हे तब्बल 35 ते 36 अंश दरम्यान राहण्याची शक्यता आहे. अशा प्रचंड उष्णेत बॉलिंग करणं गोलंदाजांसाठी आव्हानात्मक असते. त्यामुळे गोलंदाजांचा चांगलाच कस लागतो. तसेच या मैदानात रात्री हवामानात घट होते.त्यामुळे दव पडतो. अशा परिस्थितीत विजयी धावांचा बचाव करणं सोपं ठरत नाही. त्यामुळे टॉस जिंकणाऱ्या संघाचा दुबईत कायमच फिल्डिंग करण्याकडे कळ असतो. मात्र पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा याने 14 सप्टेंबरला टीम इंडिया विरुद्ध बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. परिणामी पाकिस्तानला हा सामना गमवावा लागला होता. त्यामुळे सलमान आता टॉस जिंकल्यानंतर आपली चूक सुधारणार की टीम इंडियाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.