
India Vs Pakistan Match : आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानला लोळवले. अंतिम सामन्यात तिसऱ्यांदा पाक संघाला भारताने लंबेलाट केले. आशिया कपमधील वाद आणि माफीनाम्याचे सत्र अजूनही सुरूच आहे. पाकचा कर्णधार सलमान अली आगा असो वा पाकचा मंत्री मोहसीन नक्वी असो यांच्या चुकांवर पाकिस्तानमधूनच टीकेची झोड उठली. या दोघांनी देशाचं नाक कापल्याची प्रतिक्रिया शेजारील देशात उमटत आहेत. आता नक्वी यांनी BCCI ची माफी मागितली. तर आशिया कपनंतर 5 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तानचे संघ पुन्हा भिडणार आहेत. महिला एकदिवसीय विश्वचषकात (Women One day World Cup 2025) दोन्ही संघ भिडतील. या विश्वचषकाचे आयोजन भारत आणि श्रीलंकेने केले आहे.
तणावात दोन्ही संघ भिडणार
महिला चषकात भारत आणि पाकिस्तान संघाचा सामना कोलंबो येथे खेळला जाईल. दोन्ही देशात पहलगाम हल्ल्यानंतर तणाव आहे. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त भागातील 9 दहशतवादी ठिकाणं उद्धवस्त केले होते. त्यानंतर आशिया कप 2025 मध्ये त्यावरून तणाव दिसला. आशिया कप खेळू नये अशी भावना भारतीयांची होती. तर या चषकात पाकिस्तानविरुद्ध भारताचे तीन सामने झाले. त्यात भारताने विजय मिळवला. 28 सप्टेंबर रोजी अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला हरवले.
त्यावेळी भारतीय संघाने ACC अध्यक्ष आणि पाकिस्तानचे मंत्री मोहसीन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी घेण्यास नकार दिला होता. आशिया कपमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही. दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये बाचाबाची झाली. काही खेळाडूंनी अत्यंत अशोभनीय वर्तन केले. त्यांच्यावर पाकिस्तानमधून सुद्धा टीका झाली.
महिला संघासाठी महत्त्वाचा सामना
हरमनप्रीत सिंह हिच्या नेतृत्वात भारतीय संघ सध्या फार्मात आहे. पहिल्या महिला वनडे वर्ल्ड कप जिंकण्याची तयारी टीम इंडिया करत आहे. भारताचा पहिला सामना श्रीलंकेशी झाला. टीम इंडियाची दणदणीत सुरुवात झाली. श्रीलंकेचा 59 धावांनी धुव्वा उडवला. या धमाकेदार सुरुवातीमुळे भारतीय संघाचे मनोबल उंचावले आहे. आता 5 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानला धूळ चारण्याची तयारी महिला संघाने केली आहे. भारताची उपकर्णधार आणि स्टार फलंदाज स्मृती मंधाना पाकविरोधात मोठी खेळी करेल असा दावा करण्यात येत आहे. हा सामना भारताने खिशात घातला तर पाकच्या क्रिकेट बोर्डामध्ये मोठे वादळ आल्याशिवाय राहणार नाही. राजीनामा सत्र सुरू झाल्याशिवाय राहणार नाही असे भाकीत पाकिस्तानातील क्रिकेट तज्ज्ञ वर्तवत आहेत.