
एशेज कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याचा पहिलाच दिवस गाजला. कारण पहिल्याच दिवशी एकूण 19 विकेट पडल्या. त्यामुळे हा सामना निर्णायक ठरणार हे स्पष्ट झालं आहे. सध्याची स्थिती पाहता या सामन्याचा निकाल तिसऱ्या दिवशीच लागण्याची शक्यता आहे. इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि कर्णधार बेन स्टोक्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने पहिल्या दिवशी 172 धावांवर सर्व विकेट गमावल्या. त्यामुळे हा सामना ऑस्ट्रेलियाच्या पारड्यात झुकला असंच वाटत होतं. पण तसं काही झालं नाही. इंग्लंडने जोरदार कमबॅक केलं. 172 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली. अवघ्या 123 धावांवर 9 गडी गमावले आहेत. अजूनही ऑस्ट्रेलिया 49 धावांनी पिछाडीवर आहे. जर दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात झटपट विकेट मिळाली तर इंग्लंडला काही धावांची आघाडी मिळू शकते.
इंग्लंडची सुरुवात काही चांगली झाली नाही. संघाचं खातं खुलण्याआधीच पहिला धक्का बसला. झॅक क्राऊली 6 चेंडूंचा सामना करून बाद झाला. पहिल्याच षटकात हा धक्का बसल्याने इंग्लंडचा संघ बॅकफूटवर गेला. त्यानंतर डकेट आणि ओली पोपने दुसऱ्या विकेटसाठी 33 धावांची भागीदारी केली. डकेट 21 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या जो रूटकडून अपेक्षा होत्या. मात्र त्यालाही खातं खोलता आलं नाही. चौथ्या विकेटसाठी ओली पोप आणि हॅरी ब्रूक यांनी 55 धावांची भागीदारी केली. पोप 46 धावांवर असताना बाद झाला. कर्णधार बेन स्टोक्स काही खास करेल अशी अपेक्षा होती. पण तोही 6 धावांवर बाद झाला. हॅरी ब्रूकने 61 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकार मारून 52 धावा केल्या. जेमी स्मिथ 33, गस एगकिनसन 1, ब्रायडन कार्स 6 आणि मार्क वूड 0 धावांवर बाद झाला.
इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला तोडीस तोड उत्तर दिलं. पहिल्याच षटकात एकही धाव नसताना पहिला धक्का दिला. जेक वेदराल्डला खातंही खोलता आलं नाही. मार्नस लाबुशेन 9, स्टीव्हन स्मिथ 17, उस्मान ख्वाजा 2, ट्रेव्हिस हेड 21, कॅमरून ग्रीन 24, एलेक्स कॅरे 26, मिचेल स्टार्क 12, स्कॉट बोलँड 0 धावा करून बाद झाले. आता शेवटची जोडी मैदानात आहे. यात नाथन लायन नाबाद 3 आणि ब्रँडन डोगेट नाबाद 0 धावांवर खेळत आहे. त्यामुळे आता क्रीडाप्रेमींच्या नजरा दुसऱ्या दिवशीच्या खेळाकडे लागून आहेत.