Ashes Series: 14 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाने संघ निवडताना केला असा बदल, इंग्लंडविरुद्ध प्लेइंग 11 ची घोषणा
एशेज कसोटी मालिका म्हणजे क्रीडाप्रेमींसाठी पर्वणी असते. ही मालिका 21 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी प्लेइंग 11 जाहीर केली आहे. पण ऑस्ट्रेलियाने 14 वर्षानंतर प्लेइंग 11 निवडताना मोठा निर्णय घेतला आहे.

एशेज कसोटी मालिका म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन संघातील द्वंद्व.. या कसोटी मालिकेला 100हून अधिक वर्षांचा इतिहास आहे. त्यामुळे या मालिकेत दोन्ही संघ जीवाची बाजी लावून खेळतात. यंदा ही मालिका ऑस्ट्रेलियात होत आहे. पण इंग्लंडने या मालिकेसाठी कसून तयारी केली आहे. इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी 12 खेळाडूंची निवड केली आहे. आता कोणाला बसवणार हे नाणेफेकीच्या वेळी स्पष्ट होईल. दुसरीकडे, पर्थ कसोटीच्या एक दिवस आधी ऑस्ट्रेलियानेही प्लेइंग 11 ची घोषणा केली आहे. या प्लेइंग 11 मध्ये दोन नव्या खेळाडूंना संधी दिली आहे. त्यामुळे आश्चर्याचा धक्का बसला आहे. इतकंच काय फॉर्मात असलेल्या अष्टपैलू खेळाडूला डावललं आहे. पहिल्या कसोटी सामन्यात पॅट कमिन्स, जोश हेझलवूड आणि शॉन एबॉट दुखापतीमुळे खेळणार नाही. यासाठी ऑस्ट्रेलियासाठी हा कसोटी सामना खूपच महत्त्वाचा आहे. कारण पहिला कसोटी सामना गमावला तर दबाव वाढेल.
ऑस्ट्रेलियाने प्लेइंग 11 पाहता दोन खेळाडू पदापर्ण करणार आहेत. 14 वर्षानंतर एकापेक्षा जास्त खेळाडू संघात पदार्पण करणार आहेत. यापूर्वी 2010-2011 मध्ये न्यू ईयर कसोटीत उस्मान ख्वाजा आणि माइक बियरने पदार्पण केलं होतं. आता एशेज कसोटी मालिकेत ब्रेडन डॉगेट आणि जेक वेदरॉल्ड यांना संधी मिळाली आहे. ब्रेंडन हा ऑस्ट्रेलिया कसोटी संघात डेब्यू करणारा खेळाडू क्रमांक 472 असेल. तर वेदरॉल्ड हा 473वा ऑस्ट्रेलियन खेळाडू असेल. या दोघांना संधी मिळाली तर ब्यू वेब्स्टरला संघातून डावललं आहे. अष्टपैलू वेब्स्टरने मिचेल मार्शची जागा संघात घेतली होती.
दरम्यान डेविड वॉर्नरच्या निवृत्तीनंतर ओपनिंग कोण करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. उस्मान ख्वाजासोबत सलामीला पदार्पण करणारा वेदरॉल्ड असण्याची शक्यता आहे. 2022 पासून ही ऑस्ट्रेलियाची सातवी ओपनिंग जोडी आहे. 31 वर्षीय वेदरॉल्डने शेफील्ड शील्डमध्ये चांगली कामगिरी केली होती. तर वेगवाने गोलंदाजी ब्रँडन डॉगेटला देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्याचं फळ मिळालं आहे. कमिन्स आणि हेझलवूडच्या गैरहजेरीत स्टार्क आणि बोलँडसोबत गोलंदाजीची धुरा सांभाळेल.
पर्थ कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाची प्लेइंग 11: उस्मान ख्वाजा, जेक वेदरॉल्ड, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ (कर्णधार), ट्रेविस हेड, कॅमरून ग्रीन, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नाथन लायन, ब्रँडन डॉगेट, स्कॉट बोलँड
