IND vs AUS : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया फायनल, कोण जिंकणार मालिका?

India vs Australia 3rd and Final T20i Preview : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया वूमन्स यांच्यात 21 फेब्रुवारीला टी 20i मालिका जिंकण्यासाठी रस्सीखेच असणार आहे. तिसऱ्या सामन्यासह मालिकेवर कोणता संघ आपला नाव कोरण्यात यशस्वी ठरतो? यासाठी काही तासांची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

IND vs AUS : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया फायनल, कोण जिंकणार मालिका?
AUS vs IND Harmanpreet Kaur and Sophie Molineux
Image Credit source: @BCCIWomen X Account
| Updated on: Feb 21, 2026 | 3:55 AM

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसरा आणि अंतिम टी 20i सामना शनिवारी 21 फेब्रुवारीला होणार आहे. उभयसंघातील 3 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे दोन्ही संघांना सामन्यासह मालिका जिंकण्याची समसमान संधी आहे. टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात कांगारुंना पराभूत करत ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात विजयाने केली.भारताने पहिला सामना हा डीएलएसनुसार जिंकला आणि मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. मात्र ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या आणि करो या मरो अशा सामन्यात भारतावर मात केली. ऑस्ट्रेलियाने या विजयासह मालिकेत 1-1 ने बरोबरी साधत आव्हानही कायम राखलं. अशात आता तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात दोघांपैकी कोणता संघ विजयी होणार? याची उत्सूकता क्रिकेट चाहत्यांना लागून आहे.

महिला ब्रिगेडला ऐतिहासिक कामगिरीची संधी

वूमन्स टीम इंडियाला तिसऱ्या सामन्यानिमित्ताने ऐतिहासिक कामगिरी करण्याची संधी आहे. वूमन्स टीम इंडियाला आतापर्यंत ऑस्ट्रेलियात कसोटी, एकदिवसीय आणि टी 20i पैकी कोणतीही मालिका जिंकता आलेली नाही. मात्र आता ही संधी आहे. त्यामुळे महिला ब्रिगेड कांगारुंविरुद्ध ऑस्ट्रेलियात पहिलीवहिली आंतरराष्ट्रीय मालिका जिंकण्यात यशस्वी ठरणार का? याची प्रतिक्षा चाहत्यांना लागून आहे.

पहिल्या 2 सामन्यांत काय झालं?

टीम इंडियाने 15 फेब्रुवारीला सिडनीत खेळवण्यात आलेल्या पहिल्या टी 20i सामन्यात ऑस्ट्रेलियावर 21 धावांनी मात केली. भारताने ऑस्ट्रेलियाला 18 षटकांत 133 धावांवर गुंडाळलं. प्रत्युत्तरात भारताने 5.1 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 50 धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर सामन्यात व्यत्यय आला. त्यामुळे सामन्याचा निकाल डीएलएसनुसार लागला आणि भारताने 21 धावांनी विजय मिळवला.

त्यानंतर गुरुवारी 19 फेब्रुवारीला ऑस्ट्रेलियाने भारतावर 19 धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी 164 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारताला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 144 धावांपर्यंतच पोहचता आलं. आता शनिवारी 21 फेब्रुवारीला कोण मैदान मारतं हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

स्मृती-शफालीवर मोठी जबाबदारी

टीम इंडियाला तिसरा सामना आणि मालिका जिंकायची असेल तर उपकर्णधार स्मृती मंधाना आणि लेडी सेहवाग अर्थात शफाली वर्मा या सलामी जोडीला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. या दोघींना मोठी खेळी करावी लागेल. शफालीने पहिल्या सामन्यात 21 तर दुसऱ्या टी 20i मध्ये 29 रन्स केल्या. तसेच स्मृती पहिल्या सामन्यात 16 धावांवर नाबाद राहिली. तर स्मृतीने दुसऱ्या सामन्यात 31 धावांपर्यंत मजल मारली. स्मृती आणि शफाली दोघींचेही आकडे पाहता त्यांना सुरुवात चांगली मिळतेय. मात्र त्यांना या आकड्यांना मोठ्या खेळीत बदलता येत नाहीय. त्यामुळे ही सलामी जोडी अंतिम सामन्यात काय खेळ दाखवते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Follow Us