IND vs AUS : कांगारुंना ब्रिस्बेनमध्ये पराभूत करणं आव्हानात्मक, टीम इंडिया गाबात माज उतरवणार? असे आहेत आकडे
AUS vs IND T20i Series : ऑस्ट्रेलियाची गाबातील कामगिरी ही उल्लेखनीय आहे. त्यामुळे टीम इंडियाचा 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर असूनही फायनलमध्ये कस लागणार आहे. जाणून घ्या.

सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडियाने गुरुवारी 6 नोव्हेंबरला चौथ्या आणि निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियावर 48 धावांनी मात केली. भारताने यासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी मिळवली. भारताने यासह ऑस्ट्रेलियात टी 20i सीरिज न गमावण्याची मालिका कायम ठेवली. आता भारतीय संघाला पाचव्या आणि अंतिम सामन्यात विजय मिळवून मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. मात्र भारतासाठी कांगारुंना ब्रिस्बेनमधील ‘द गाबा’त पराभूत करणं सहजासहजी शक्य होणार नाही. ऑस्ट्रेलियाचे या मैदानातील आकडे दमदार आहेत. ऑस्ट्रेलियाने या मैदानात फक्त 1 टी 20i सामना गमावला आहे. तर भारताने या मैदानात एकमेव टी 20i सामना खेळला आहे. त्यामुळे हा सामना भारतासाठी आव्हानात्मक असणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पाचवा सामना हा शनिवारी 8 नोव्हेंबरला होणार आहे. भारतीय संघ या मालिकेत आघाडीवर आहे. त्यामुळे भारताला या सामन्यासह मालिका जिंकण्याची दुहेरी संधी आहे. तर यजमानांसमोर सामना जिंकून मालिका बरोबरीत करण्याचं दुहेरी आव्हान आहे. त्यामुळे कांगारुंसमोर भारताला रोखण्याचं आव्हान आहे. मात्र कांगारुंची या मैदानातील कामगिरी त्यांच्यासाठी दिलासादायक आहे.
ऑस्ट्रेलियाचे ब्रिस्बेनमधील आकडे
ऑस्ट्रेलियाने या मैदानात आतापर्यंत टी 20i क्रिकेटच्या इतिहासात एकूण 8 सामने खेळले आहेत. ऑस्ट्रेलियाने या 8 पैकी 1 सामन्याचा अपवाद वगळता 7 वेळा विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलिया या मैदानात गेल्या 12 वर्षांपासून अजिंक्य आहे. ऑस्ट्रेलियाने या मैदानातील पहिला आणि एकमेव सामना हा 2013 साली गमावला होता. तेव्हापासून ऑस्ट्रेलियाची या मैदानातील विजयी घोडदौड सुरुच आहे. त्यामुळे भारताला ही मालिका जिंकायची असेल तर कांगारुंची विजयी घोडदौड थांबवावी लागेल.
भारताचे आकडे
ऑस्ट्रेलियाने या मैदानात 8 सामने खेळलेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाकडे या मैदानात टीम इंडियाच्या तुलनेत खेळण्याचा अनुभव आहे. तसेच खेळपट्टीची माहिती आहे. सोबतच ते यजमानही आहेत. तर दुसर्या बाजूला तर टीम इंडियाने या मैदानात एकमेव टी 20i सामना खेळला आहे.
भारताला या मैदानात खेळलेल्या एकमेव सामन्यात पराभूत व्हावं लागलंय. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 2018 साली या मैदानात टी 20i सामना खेळवण्यात आला होता. भारताचा या सामन्यात डीएलएसनुसार 4 धावांनी पराभव झाला होता. त्यामुळे आता टीम इंडिया गेल्या पराभवाची परतफेड करणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
