
आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्य फेरीत टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहेत. हा सामना नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमध्ये आयोजित करण्यात आला आहे. सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. तर त्याआधी 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. पुन्हा एकदा भारताच्या विरोधात नाणेफेकीचा कौल लागला. ऑस्ट्रेलिया कॅप्टन एलिसा हिली हीने फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता भारतीय गोलंदाजांवर ऑस्ट्रेलियाला मोठा धावसंख्या उभारण्यापासून रोखण्याचं आव्हान आहे.
ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडिया दोन्ही संघांनी या आर या पार अशा सामन्यात प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत. भारताकडून 3 तर ऑस्ट्रेलियाकडून 1 बदल करण्यात आला आहे. फिनीशर ऋचा घोष आणि बॉलर क्रांती गौड या दोघींचं कमबॅक झालं आहे. त्यामुळे उमा चेत्री आणि हर्लीन देओल या दोघींना बाहेर व्हावं लागलं आहे.
तसेच टीम इंडियाची स्टार ओपनर प्रतिका रावल हीला दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं आहे. प्रतिकाच्या जागी लेडी सेहवाग अर्थात शफाली वर्माला संधी देण्यात आली आहे. शफालीचा प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. शफालीला थेट उपांत्य फेरीत संधी मिळाल्याने तिच्यावर धावा करण्याचा दबाव असणार आहे. त्यामुळे शफालीसमोर आव्हानात्मक आणि निर्णायक सामन्यात मोठी खेळी करुन चमकण्याची संधी आहे.
तर ऑस्ट्रेलियाकडून प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकमेव बदल करण्यात आला आहे. जॉर्जिया वॉरहॅम हीच्या जागी सोफी मोलिनक्स हीला संधी देण्यात आली आहे.
टीम इंडियाला अंतिम फेरीचं तिकीट मिळवायचं असेल तर ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखावा लागणार आहे. ऑस्ट्रेलिया या स्पर्धेतील एकमेव अजिंक्य टीम आहे. त्यामुळे टीम इंडिया ऑस्ट्रेलियाची विजयी घोडदौड रोखणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
भारतीय महिला संघाची प्लेइंग ईलेव्हन : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, अमनजोत कौर, जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, राधा यादव, क्रांती गौड, ऋचा घोष (विकेटकीपर), श्री चरणी आणि रेणुका सिंग ठाकूर.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : फोबी लिचफील्ड, एलिसा हिली (कॅप्टन आणि विकेटकीपर), एलिस पेरी, बेथ मूनी, ॲनाबेल सदरलँड, ॲशले गार्डनर, ताहलिया मॅकग्रा, सोफी मोलिनक्स, अलाना किंग, किम गर्थ आणि मेगन शूट.