AUS vs NZ : सोफी डीव्हाईनची शतकी खेळी व्यर्थ, ऑस्ट्रेलियाची न्यूझीलंडवर सलग 16 व्यांदा मात, वर्ल्ड कपमध्ये विजयी सलामी
Australia Women vs New Zealand Women Match Result : गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने आपला दबदबा कायम ठेवत वूमन्स वर्ल्ड कप स्पर्धेतील मोहिमेची सुरुवात विजयाने केली आहे. एश्ले गार्डनर हीने ऑस्ट्रेलियाच्या विजयात निर्णायक भूमिक बजावली.

गतविजेत्या ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमने आयसीसी वूमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंड वूमन्सवर 89 धावांनी दणदणीत विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने अश्ले गार्डनर हीच्या शतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडसमोर 327 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्यानंतर सोफी डीव्हाईन हीने न्यूझीलंडला जिंकवण्यासाठी पूर्ण जोर लावला. सोफीने शतक करत न्यूझीलंडच्या विजयाची आशा कायम ठेवली होती. मात्र तिला दुसऱ्या बाजूने अपेक्षित साथ मिळाली नाही. ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्यासमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. ऑस्ट्रेलियाने एक एक करुन झटके देत किवींना 43.2 ओव्हरमध्ये 237 रन्सवर गुंडाळलं. कांगारुंनी अशाप्रकारे 2017 पासून न्यूझीलंड विरुद्ध एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सलग 16 वा विजय साकारला.
न्यूझीलंडची सुपर फ्लॉप सुरुवात
न्यूझीलंडच्या सलामी जोडीने विजयी धावांचा पाठलाग करताना घोर निराशा केली. न्यूझीलंडच्या सलामीच्या फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. त्यांनतर एमिला केर आणि कॅप्टन सोफी डिव्हाईन या दोघींनी तिसर्या विकेटसाठी 75 धावांची भागीदारी केली. त्यानंतर एमिला 33 रन्सवर आऊट झाली. त्यानंतर किंवींनी चौथ्या विकेटसाठी 52 धावा जोडल्या.
तर दुसऱ्या बाजूने कांगारुंनी किवींना ठराविक अंतराने झटके देणं सुरु ठेवलं. मात्र सोफीने एक बाजू लावून धरली होती. त्यामुळे किवींना विजयाची आशा होती. मात्र सोफी आऊट होताच होती नव्हती विजयाची आशा मावळली. सोफीने न्यूझीलंडसाठी सर्वाधिक 112 धावा केल्या. तर इतर फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर सरेंडर केलं. ऑस्ट्रेलियासाठी अनाबेल सदरलँड आणि सोफी मोलिनेक्स या दोघींनी सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. तर एलाना किंग हीने 2 विकेट्स मिळवल्या.
पहिल्या डावात काय झालं?
त्याआधी ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने 49.3 ओव्हरमध्ये ऑलआऊट 326 रन्स केल्या. ऑस्ट्रेलियासाठी एश्ले गार्डनर हीने सर्वाधिक 115 धावा केल्या. फोबी लिचफिल्ड हीने 45, किम गर्थ 38 आणि एलीसा पेरीने 33 धावांचं योगदान दिलं. तसेच इतरांनीही धावा जोडल्या. त्यामुळे कांगारुंना 325 पार मजल मारता आली. न्यूझीलंडसाठी एकूण 6 जणींनी बॉलिंग केली. मात्र कुणा एकाही गोलंदाजाला ऑस्ट्रेलियाला रोखता आलं नाही. 6 पैकी चौघींनी विकेट्स मिळवल्या. मात्र न्यूझीलंडचे गोलंदाज कांगारुंना झटपट बाद करण्यात अपयशी ठरले.
कांगारुंचा विजयी झंझावात कायम
दरम्यान न्यूझीलंडला हा सामना जिंकून 8 वर्षांची मालिका खंडीत करण्यासह स्पर्धेत विजयी सलामी देण्याची संधी होती. मात्र कांगारुंनी तसं होऊ दिलं नाही आणि किंवी विरुद्ध सलग 16 वा एकदिवसीय विजय मिळवला. न्यूझीलंडने ऑस्ट्रेलिया विरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना हा फेब्रुवारी 2017 साली जिंकला होता.
