AUS vs SA : कांगारुंची पहिल्या सामन्यातच दुर्दशा, 98 धावांनी धुव्वा, दक्षिण आफ्रिकेची कडक सुरुवात
Australia vs South Africa 1st ODI Match Result : दक्षिण आफ्रिकेने टेम्बा बावुमा याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियावर मात करत एकदिवसीय मालिकेत विजयी सलामी दिली आहे. दक्षिण आफ्रिकेने कांगारुंना 98 धावांनी लोळवलं.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात 2-1 अशा फरकाने टी 20I मालिका जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाची वनडे सीरिजमधील पहिल्यात सामन्यात दुर्दशा झालेली पाहायला मिळाली. दक्षिण आफ्रिकेने कांगारुंचा पहिल्या सामन्यात मोठ्या फरकाने धुव्वा उडवत कडक सुरुवात केली. दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियासमोर 297 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर 41 ओव्हरही खेळता आलं नाही. दक्षिण आफ्रिकेने कांगारुंना 40.5 ओव्हरमध्ये 198 रन्सवर गुंडाळलं. दक्षिण आफ्रिकेने अशाप्रकारे 98 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने अशाप्रकारे 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशा फरकाने आघाडी घेतली. दोन्ही संघांचा हा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 नंतरचा पहिलाच सामना होता. उभयसंघातील पहिला सामना हा केर्न्समधील कॅजलिस स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला होता.
दक्षिण आफ्रिकेची बॅटिंग
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकेला बॅटिंगसाठी भाग पाडलं. दक्षिण आफ्रिकेच्या सलामी जोडीने संघाला कडक सुरुवात करुन दिली. एडन मारक्रम आणि रियान रिकेल्टन या सलामी जोडीने 92 धावांची भागीदारी केली. मारक्रमने 82 धावा केल्या. एडन या सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. रियानने 33 धावांचं योगदान दिलं. तर कर्णधार टेम्बा बावुमा याने अर्धशतक ठोकलं. बावुमाने 65 धावांची खेळी केली. तर मॅथ्यू ब्रीट्झके याने 57 धावांची निर्णायक खेळी साकारली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने 50 ओव्हरमध्ये 296 धावापर्यंत मजल मारली.
ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूड याने चिवट बॉलिंग केली. मात्र ट्रेव्हिस हेड याने भाव खाल्ला. हेडने तब्बल 4 विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेला 300 पार जाण्यापासून रोखलं. बेन ड्वारशुईस याने दोघांना बाद केलं. तर एडम झॅम्पाने 1 विकेट घेतली.
केशवसमोर कांगारु ढेर
ऑस्ट्रेलियाला विजय मिळवण्यासाठी 297 धावा करायच्या होत्या. ट्रेव्हिस हेड आणि कॅप्टन मिचेल मार्श या सलामी जोडीने चांगली सुरुवात केली. मात्र फिरकी गोलंदाजांना खेळपट्टीतून मदत मिळाली. केशव महाराजसमोर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. केशवने अवघ्या 33 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे केशवने त्याच्या कोट्यातील पहिल्या 26 चेंडूतच या 5 विकेट्स घेतल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची 6 आऊट 89 अशी स्थिती झाली.
केशवने दिलेल्या दणक्याने ऑस्ट्रेलियाची नाजूक स्थिती झाली. मिचेल मार्श याने एक बाजू लावून धरली. मार्शने ऑस्ट्रेलियाला सामन्यात कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या बाजूने कांगारुंची घसरगुंडी झाली. दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला 40.5 ओव्हरमध्ये 198 रन्सवर गुंडाळलं. दक्षिण आफ्रिकेने अशाप्रकारे हा सामना हा 98 धावांनी आपल्या नावावर केला. दक्षिण आफ्रिकेसाठी केशव व्यतिरिक्त नांद्रे बर्गर आणि लुंगी एन्गिडी या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या.
