
एशेज कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा दिसून आला. पहिल्या डावात इंग्लंडने 172 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ 132 धावांवर बाद झाला होता. त्यामुळे कसोटीतील पहिल्या डावात इंग्लंडला 40 धावांचा आघाडी मिळाली होती. पण दुसऱ्या डावात इंग्लंडचा संघ काही खास करू शकला नाही. 164 धावांपर्यंत मजल मारू शकला. त्यामुळे पहिल्या डावातील आघाडीचे 40 धावा मिळून 204 धावा झाल्या आणि विजयासाठी 205 धावांचं आव्हान दिलं. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंच ऑस्ट्रेलियाने आक्रमक फलंदाजीचं दर्शन घडवत हे आव्हान पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने 2 गडी गमवून 205 धावा केल्या. यासह पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. या विजयासह ऑस्ट्रेलियाचा वर्ल़्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील दावा आणखी पक्का झाला. आतापर्यंत खेळलेल्या चारही सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला असून विजयी टक्केवारी 100 आहे. तसेच पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे.
इंग्लंडचा दुसरा डाव काही खास गेला नाही. मिचेल स्टार्क, बोलँड आणि ब्रेंडन डोगेटने इंग्लंडचा संपूर्ण संघ तंबूत पाठवला. मिचेल स्टार्कने दुसऱ्या डावात 12 षटकं टाकली आणि 55 धावा देत 3 गडी बाद केले. तर बोलँडने 11.4 षटकात 33 धावा देत 4 जणांना तंबूचा रस्ता दाखवला. ब्रेंडन डोगेटने 9 षटकात 51 धावा देत 3 गडी टिपले. इंग्लंडकडू बेन डकेटने 28, ओली पोपने 33, गस एटकिनसनने 37, जेमी स्मिथ 15 आणि ब्रायडन कार्सने 20 धावा केल्या. या व्यतिरिक्त एकही फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकलं नाही. दोघांना तर खातंही खोलता आलं नाही.
ऑस्ट्रेलियाने विजयी धावांचा पाठलाग करताना आक्रमक सुरुवात केली. ट्रेव्हिस हेडने 83 चेंडूत 16 चौकार आणि 4 षटकार मारत 123 धावा केल्या. तसेच मार्नस लाबुशेनने 49 चेंडूत नाबाद 51 धावांची खेळी केली. इंग्लंडकडून दुसर्या डावात काही खास गोलंदाजी झाली नाही. ब्रायडन कार्सने दोन विकेट काढल्या. या व्यतिरिक्त एकही गोलंदाज प्रभावी ठरला नाही. ट्रेव्हिस हेड म्हणाला की, ‘अविश्वसनीय होते. भावना खूपच तीव्र आहेत. त्यांनीकाल मैदानात खरोखरच चांगले प्रदर्शन केले आणि ते मागे खेचू लागले, त्यामुळे आम्हाला माहित होते की आम्हाला सामना गमावणं परवडणारं नाही. मी ज्या पद्धतीने योगदान दिले. ते खूप खास वाटते.‘