
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेला अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. पण असं असताना बांगलादेशचं या स्पर्धेत खेळणं कठीण होत चाललं आहे. कारण आयसीसीने दिलेली डेडलाईन संपली असून बांग्लादेश भारतात खेळण्यास तयार नाही. आयसीसी या प्रकरणी लवकरच निकाल देणार आहे. बांगलादेशच्या जागी स्कॉटलँड संघाला स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे, बांगलादेशचा कर्णधार लिट्टन दास याचं विधान चर्चेत आलं आहे. कारण त्याने स्वत: बांगलादेशमध्ये असुरक्षित असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. लिट्टन दासने एका पत्रकार परिषदेत टी20 वर्ल्डकप स्पर्धेबाबत विधान करताना सांगितलं. या मुद्द्यावर त्याला प्रश्न विचारल्यानंतर लिट्टन दास म्हणाला की, ‘या मुद्द्यावर मी काही बोलणं माझ्यासाठी सुरक्षित नाही.’ लिट्टन दासने पुढे स्पष्ट केलं की, संघातील कोणत्याही खेळाडूला टी20 वर्ल्डकप खेळणार की नाही ते माहिती नाही.
लिट्टन दासने बांग्लादेश क्रिकेट बोर्डावर अप्रत्यक्षरित्या ताशेरे ओढले. बांग्लादेश संघाला माहिती असावं की टी20 वर्ल्डकप स्पर्धेत कोणत्या संघाविरुद्ध खेळणार आहोत. लिट्टन दास म्हणाला की, ‘जर आम्हाला माहित असते की आमच्या गटातील प्रतिस्पर्धी कोण असतील किंवा आम्ही कोणत्या देशात खेळणार आहोत, तर ते उपयुक्त ठरेल.” लिटन पुढे म्हणाला की, “तुम्ही पाहिले आहे की आम्ही संघ जाहीर केला आहे. परंतु आतापर्यंत कोणत्याही खेळाडूला माहित नाही की आम्ही कोणत्या देशात जाणार आहोत किंवा आम्ही कोणाविरुद्ध खेळणार आहोत. माझ्याप्रमाणे, संपूर्ण बांगलादेश अनिश्चिततेत आहे.’
भारत आणि बांग्लादेश यांच्यातील संबंध गेल्या काही दिवसात ताणले गेले आहेत. बीसीसीसीआयच्या आदेशानंतर वेगवान गोलंदाज मुस्तफिझुर रहमान याला आयपीएलमधून काढून टाकलं. त्यानंतर दोन्ही देशात वाद टोकाला गेला आहे. बांगलादेशने टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतात संघ पाठवण्यास नकार दिला आहे. लिटन दास याने बांग्लादेश प्रीमियर लीग स्पर्धेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. बांग्लादेश प्रीमियर लीग स्पर्धेत इतके सामने खेळणं काही योग्य नव्हतं. लिट्टन दासने सांगितलं की,’जीवनात काही गोष्टी आदर्श नसतात. पण तुम्हाला त्या परिस्थितीनुसार मान्य कराव्या लागतात. बीपीएलमध्ये इतके सामने खेळणं काही योग्य नव्हतं. पण तरीही आम्हाला खेळायचं होतं.’