
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेला अवघे काही दिवस शिल्लक असताना बांग्लादेश क्रिकेट बोर्डाला दणका बसला आहे. भारतात खेळणार नसल्याच्या भूमिकेनंतर स्पर्धेतूनच पत्ता कापला आहे. आता बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने देशाच्या क्रिकेटचं किती नुकसान केलं याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यांनी स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाला आयसीसी आणि बीसीसीआयसोबत वाकड्यात जाणं महागात पडलं आहे. एकीकडे वर्ल्डकप स्पर्धेत खेळत नसल्याने कोट्यवधींचं नुकसान झालं. दुसरीकडे, एक मोठी स्पर्धा हातून गेल्यात जमा झाली आहे. कारण भविष्यात आयसीसी स्पर्धांचं यजमानपद बांगलादेशला मिळणं आता कठीण होणार आहे.
बांगलादेशला काही वर्षांपूर्वी टी20 वर्ल्डकपचं यजमानपद दिलं होतं. इतकंच काय तर वनडे वर्ल्डकप 2011 स्पर्धेसाठी भारत श्रीलंकेसोबत यजमान होता. आयसीसी स्पर्धांचं यशस्वी आयोजन केल्यानंतर आणि वाढती लोकप्रियता पाहून आयसीसीने बांगलादेशला एका मोठ्या स्पर्धेचं यजमानपद दिलं होतं. बांगलादेशला वर्ल्डकप 2031 साठी यजमानपद दिलं होतं. विशेष म्हणजे भारतासोबत त्यांना हे यजमानपद भूषवायचं होतं. पण आता आयसीसीने कठोर भूमिका घेतली तर हे यजमानपद बांगलादेशच्या हातून जाऊ शकतं. त्यामुळे बांग्लादेश क्रिकेट बोर्डाची मोठी कमाई हातून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात बांग्लादेश क्रिकेट बोर्डाला खूपच मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आयसीसी बांगलादेशची अनेक स्तरांवर कोंडी करू शकते. वर्ल्डकप स्पर्धेत खेळण्यास नकार दिल्याने आयसीसीकडून मिळणारा वार्षिक उत्पन्न बंद केलं जाऊ शकतं. ही रक्कम थोड थोडकी नाही तर 325 कोटी बांगलादेशी टका इतकी आहे. ही रक्कम पूर्ण कापली नाही तर त्यापैकी काही टक्के रक्कम कापली जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. इतकंच काय स्पर्धेत भाग घेणाऱ्या आणि सामना जिंकवल्यावर मिळणारी रक्कमही हातून जाणार आहे. याचा पूर्ण परिणाम हा बांगलादेशी महिला क्रिकेट टिम आणि अंडर 19 क्रिकेट संघावर होण्याची शक्यता आहे. त्यांच्या पुढच्या काही वर्षांसाठी बंदी घातली जाऊ शकते. त्यामुळे बांगलादेशचं क्रिकेट भविष्य अंधारात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.