मोठा खुलासा! टी20 वर्ल्डकप स्पर्धेबाबत बांगलादेशी खेळाडूंचं म्हणणं टाळलं
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतून बांग्लादेशचा पत्ता कट झाला आहे. क्रिकेट बोर्ड आणि सरकारच्या आडमुठ्या भूमिकेमुळे बांग्लादेश क्रिकेटला फटका बसला आहे. भारतात खेळायचं नाही या एका भूमिकेमुळे सर्व काही संपुष्टात आलं. आता एक मोठा खुलासा समोर आला आहे.

आयपीएल स्पर्धेतून मुस्तफिझुर रहमान काढल्यानंतर बांग्लादेश क्रिकेट बोर्ड आणि सरकारने भारतात खेळणार नसल्याची भूमिका घेतली. यासाठी आयसीसीने वारंवार अल्टिमेटम दिला. स्पर्धेसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना बांग्लादेश क्रिकेट बोर्ड काही निर्णय घेत नव्हतं. सरकार देखील त्याच भूमिकेवर ठाम होतं. अखेर 22 जानेवारीला सरकारने भारतात खेळणार नाही ही भूमिका स्पष्ट केली. त्यानंत आयसीसीने बांगलादेशचा स्पर्धेतील पत्ता कट केला. बांग्लादेश सरकार, क्रिकेट बोर्ड आणि खेळाडूंची एक बैठक या निर्णयापूर्वी पार पडली होती. यावेळी खेळाडूंचं म्हणणं काय आहे? हे जाणून घेण्याची तसदी सरकार आणि क्रिकेट बोर्डाने घेतली. त्यांना थेट सांगितलं गेलं की टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळणार नाही. त्यामुळे खेळाडूंना मानसिक धक्का बसला. कारण अनेक खेळाडूंचं टी20 वर्ल्डकप खेळण्याचं स्वप्न एका झटक्यात उद्ध्वस्त झालं.
रिपोर्टनुसार, कर्णधार लिट्टन दास आणि कसोटी कर्णधार नजमुल हुसैन शांतो यांनी आपलं म्हणणं सरकारपुढे मांडलं. त्यांनी ठामपणे सांगितलं की स्पर्धा खेळण्यासाठी तयार आहोत. पण बांग्लादेश क्रिकेट बोर्ड आणि सरकारने सुरक्षेचं कारण पुढे करत त्यांना नकार दिला. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, बांगलादेशच्या एका खेळाडूने सांगितलं की सरकारने या बैठकीपूर्वीच शेवटचा निर्णय घेतला होता. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळणार नाही हे स्पष्ट झालं होतं. क्रिकेटपटूने सांगितलं की, ‘त्यांचं म्हणणं ऐकून देखील घेतलं नाही. त्यांनी सरळ एक प्लान तयार केला आणि सांगितलं की असं होऊ शकत नाही. यापूर्वी ते आमच्यासोबत बसायचे आणि चर्चा करून आमचं म्हणणं ऐकायचे. पण यावेळी त्यांनी स्पष्ट सांगितलं की आपण जात नाहीत. बांगलादेश सरकारच्या आदेशापूर्वीच हे ठरलं होतं. सरकारकडून स्पष्ट संदेश होता की असं होणार नाही.’
बांगलादेशचं टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळण्याचं स्वप्न भंगलं आहे. आता त्यांना फक्त हे सामने घरी बसून पाहावे लागतील. त्यांची जागा आधीच स्कॉटलंड संघाने घेतली आहे. बांगलादेशचे सर्व सामने आता स्कॉटलंड संघ खेळणार आहे. साखळी फेरीतील पहिले तीन सामने कोलकात्यात आणि शेवटचा सामना मुंबईत होणार आहे.
