आयपीएल आता सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये करण्याचा विचार! वर्षातून दोनदा होणार स्पर्धा? असं का ते जाणून घ्या

आयपीएल 2026 स्पर्धेत आता फक्त तीन सामन्यांचा खेळ शिल्लक राहिला आहे. एलिमिनेटर, क्वॉलिफायर 2 आणि अंतिम सामना असा आयपीएलचा शेवटचा टप्पा आहे. पण ही स्पर्धा संपण्यापूर्वीच स्पर्धेच्या पुढच्या आयोजनाबाबत खलबतं सुरू झाली आहेत. चला जाणून घेऊयात बीसीसीआयच्या गोटात काय सुरू आहे ते...

आयपीएल आता सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये करण्याचा विचार! वर्षातून दोनदा होणार स्पर्धा? असं का ते जाणून घ्या
आयपीएल आता सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये करण्याचा विचार! वर्षातून दोनदा होणार स्पर्धा? असं का ते जाणून घ्या
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 27, 2026 | 3:03 PM

आयपीएल 2026 स्पर्धा आता जवळपास संपल्यातच जमा आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 31 मे रोजी होणार आहे. आयपीएल 2026 स्पर्धा 28 मार्चपासून सुरू झाली होती आणि 31 मे रोजी संपणार आहे. यात एकूण 74 सामन्यांचा खेळ होणार आहे. आरसीबीने अंतिम फेरीत धडक मारली असून दुसरा संघ क्वॉलिफायर 2 फेरीतून कळेल. असं असताना चॅम्पियन्स कोण होईल? हे अंतिम सामन्याच्या निकालानंतर कळेल. पण बीसीसीआयकडून आयपीएलच्या पुढच्या पर्वासाठी नियोजन सुरू झालं आहे. या नियोजनात वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा सुरू झाली आहे. आयपीएल 2027 स्पर्धेसाठी काय नवीन असेल आणि त्यासाठी काय करावं याबाबत विचारविनिमय सुरू आहे. यात आयपीएल स्पर्धेचं आयोजन सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये करण्याचा विचार केला जात आहे. आयपीएलचे चेअरमन अरूण धूमल यांनी एका मुलाखतीत हे विचार मांडले आहेत. त्यांच्या मते मे महिन्यात प्रचंड उकाडा असतो आणि त्याबाबत विचार करण्याची गरज आहे.

भारतात यंदा उकाड्याने विक्रम मोडीत काढला आहे. प्रचंड उष्णता असून बाहेर पडणं कठीण झालं आहे. त्यात उत्तर आणि पश्चिम भारतात तापमान कमालीचं वाढलं आहे. त्यामुळे मे महिन्यातील तापमान असह्य झालं आहे. त्याच्या परिणाम आयपीएल पाहण्यासाठी येणार्‍या प्रेक्षकांच्या उपस्थितीवर झाला आहे. इतकंच काय तर खेळाडूंचं आरोग्यावर या तापमान वाढीचा फटका बसत आहे. यामुळे स्पर्धेचा कालावधी बदलण्याची चर्चा होत आहे.

स्पोर्टस्टार वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत धूमल म्हणाले की, “आम्हाला प्रसारकांसोबत बसून ही स्पर्धा दुसऱ्या कालावधीत हलवता येईल का, यावर चर्चा करावी लागेल. एक सूचना सप्टेंबर-ऑक्टोबरच्या कालावधीची आहे, जो सर्वोत्तम आहे कारण तो दिवाळीच्या काळात येतो आणि जाहिरातदारांसाठी चांगला काळ असतो. पुढील द्विपक्षीय निविदा प्रक्रियेदरम्यान हा कालावधी उपलब्ध आहे का, हे आम्ही पाहू.”

तसं पाहिलं तर आयपीएल स्पर्धा पहिल्या पर्वापासून मार्च ते मे दरम्यान आयोजित केली जाते. कोविड कालावधीतील दोन पर्वात फक्त नियोजन वेगळ्या पद्धतीने करण्यात आलं होतं. त्यामुळे या स्पर्धेचं वेळापत्रक हलवणं वाटतं तितकं सोपं नाही. त्यामुळे ही स्पर्धा दोन टप्प्यात शक्य आहे का? असाही एक पर्याय पुढे आला आहे. धूमल म्हणाले की, मे महिन्यात वाढणारी उष्णता लक्षात घेता, मंडळ ही स्पर्धा फेब्रुवारी ते एप्रिल आणि नंतर वर्षाच्या सप्टेंबर-ऑक्टोबर आयोजित करण्याच्या शक्यतेचा शोध घेत आहे

Follow Us