
रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी भारताला 2024 साली वर्ल्ड कप जिंकून दिल्यानंतर टी 20i क्रिकेटला अलविदा केला. भारतीय क्रिकेट चाहते टी 20i वर्ल्ड कप जिंकल्याच्या आनंदात होते. तर या दोघांनी कुणाच्याही ध्यानी मनी नसताना निवृत्तीचा निर्णय घेतला आणि चाहत्यांना झटका दिला. दोघांनी काही महिन्यांनी पुन्हा तसंच केलं. इंग्लंड दौऱ्याच्या काही आठवड्यांआधी रोहित आणि विराट या दोघांनी टेस्ट क्रिकेटलाही अलविदा केला. दोघांनीही इंस्टाग्रामद्वारे या निर्णायाची माहिती दिली. त्यानंतर आता दोघांच्या एकदिवसीय क्रिकेटमधील निवृत्तीचीही चर्चा रंगली आहे. अशात बीसीसीआयनेच यावर भाष्य केलं आहे.
बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी रोहित आणि विराटच्या वनडे रिटायरमेंटवर भाष्य केलं आहे. रोहित आणि विराट निवृत्त होणार नाहीत. दोघेही खेळताना दिसतील. दोघांचा एकदिवसीय क्रिकेटमधील विक्रम हा अप्रतिम आहे, असं शुक्ला यांनी म्हटलंय.
राजीव शुक्ला यूपी टी 20 लीग स्पर्धेदरम्यान टॉक शोमध्ये सहभागी झाले होते. शुक्ला यांनी या दरम्यान विराट आणि रोहितच्या वनडे निवृत्तीच्या चर्चा फेटाळल्या आणि ते खेळत राहणार असल्याचं स्पष्ट केलं. तसेच रोहित आणि विराटला सचिन तेंडुलकर प्रमाणे बीसीसीआयकडून निरोप दिला जाणार का? असा प्रश्न या टॉक शोमध्ये विचारण्यात आला. यावर शुक्ला काय म्हणाले? जाणून घेऊयात.
हे दोघे आताही वनडे क्रिकेट खेळत आहेत. मात्र त्यानंतरही रोहित आणि विराटबाबत लोकं इतकी चिंता का करतायत? असं शुक्ला यांनी म्हटलं.
“त्यांनी निवृत्ती केव्हा घेतली? रोहित आणि विराट आताही वनडे क्रिकेट खेळत आहेत. ते आताही खेळत आहेत. मग आताच निरोप देण्याबाबत का म्हटलं जात आहे. लोकं आतापासूनच याची चिंता कशामुळे करत आहेत?”, असंही राजीव शुक्ला यांनी म्हटलं.
दरम्यान ऑक्टोबर महिन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय मालिका नियोजित आहे. या मालिकेचा थरार हा 19 ते 25 ऑक्टोबर दरम्यान रंगणार आहे. रोहित आणि विराट दोघेही या मालिकेत खेळताना दिसणार आहेत.