
भारताची कसोटी आणि वनडे फॉर्मेटमध्ये सुमार कामगिरी सुरू आहे. गेल्या काही मालिकांमध्ये याची प्रचिती आली आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघाची अधोगती झाल्याची टीका आता होत आहे. दुसरीकडे, त्याचा फॉर्म पाहता त्याला टी20 संघातून वगळण्यात आलं आहे. त्यामुळे खडबडून जागा झालेल्या शुबमन गिलने वनडे आणि कसोटीसाठी एक प्लान आखला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून त्याने योजना तयार केली आहे. शुबमन गिलने कसोटीसाठी काही सूचना केल्या आहेत.इतकंच काय तर बीसीसीआयकडे एक मागणीही केली आहे. त्याचं म्हणणं बीसीसीआयने मान्य केलं तर कसोटी संघातील सर्व खेळाडूंना ते मान्य करावं लागेल. कर्णधार शुबमन गिलच्या मते, कसोटी संघातील नियमित खेळाडूंना रणजी स्पर्धेत किमान एक सामना खेळणं आवश्यक आहे. यामुळे खेळाडूंना रेड बॉल क्रिकेटचा जास्तीत जास्त सराव होईल. खासकरून आयपीएलपूर्वी असं करणं भाग आहे. कारण टीम इंडिया आता ऑगस्टपर्यंत कसोटी सामना खेळणार नाही.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेची सुरुवात भारताने इंग्लंड दौऱ्यापासून केली. या दौऱ्यात भारताने मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली. त्यानंतर वेस्ट इंडिजला 2-0 ने मात दिली. पण दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत 2-0 ने मात खावी लागली. त्यामुळे भारताचं गणित बिघडलं. तसचे विजयी टक्केवारीत घट झाली. मिडिया रिपोर्टनुसार, शुबमन गिलने या संदर्भात प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांच्याशी चर्चा केली. व्यवस्थापनानेही त्याच्या योजनेला दुजोरा दिला आहे. यामुळे खेळाडू रेड बॉल क्रिकेटशी जोडलेले राहतील. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध पराभवाची कारण मीमांसा करण्यात आली. यात खेळाडूंना फॉर्मेट बदलल्यानंतर तयारीसाठी फार वेळ मिळाला नसल्याचं दिसून आलं आहे. भारत ऑगस्ट महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.
वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी आतापासून तयारी सुरू करण्यात आली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे स्टार फलंदाज घाम गाळत आहेत. दुसरीकडे, शुबमन गिल संघ व्यवस्थापनासोबत पुढची रणनिती आखत आहेत. या तयारीसाठी दीड वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे या दीड वर्षात शुबमन गिलच्या कर्णधारपदाचा कस लागणार आहे. त्यामुळे त्याने वनडे आणि कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रीत केलं आहे.